सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प जोडिदाराच्या शोधार्थ अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडत आहे. तर थंडीपासुन स्वत:च्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी ऊनाला येवून बसतात. शेणखताजवळच्या ऊबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधुन, दाराच्या फटीतुन ऊबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता याकाळात जास्त असते.
त्यामुळे या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात देखील विलक्षण वाढ होते. बागकाम करणार्या बागप्रेमींनी, शेतात काम करणार्या शेतकर्यांनी तसेच निसर्गभ्रमंती करणार्या हौशी नागरिकांनी व गिर्यारोहकांनी आपली स्वत:ची विशेष काळजी घेणे याकाळात खुप गरजेचे आहे.
ज्यासाठी अडगळीच्या ठिकाणी काम करताना अथवा फिरताना पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बुट वापरावेत. शेतकर्यांनी राञी धारे धरताना व उसतोड कामगारांनी ऊसतोड करताना गमबुट वापरावेत. अडगळीच्या ठिकाणी थेट हात न घालता काम सुरू करण्यापुर्वी त्याठिकाणी लांब काठी फिरवुन घ्यावी जेणेकरून हालचाल झाल्याने तिथले सरपटणारे प्राणी तिथुन दुर निघुन जातील. तसेच खिडकी, दार बंद केल्यावर फट राहणार नाही याची काळजी घ्यावी व बाथरूमच्या पाईपला जाळी बसवलेली असावी.
सापांचा रंग व त्यावरील नक्षीकाम हे केमोफ्लॅश प्रकारचे अर्थात पर्यावरणाशी खुप मिळते जुळते असते. त्यामुळे ते मानवाच्या दृष्टीने सहज वेगळे ओळखणे कठीण असते. याउलट मांजरांची नजर अतिशय तिक्ष्ण असते त्याच्या नजरेतुन हे सुटणे अशक्य असते. त्यामुळे मोकळ्या शेतात, रानात घर असणार्यांनी मांजर पाळणे खुप फायद्याचे ठरते मांजर अशा सरपटणार्या प्राण्यांबद्दल आपणास कळत-नकळत सावधान करते. त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात. या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजेच मुंगूस त्याच्यामुळेही घोणसची संख्या नियंञणात येते.
घोणस आणि अजगर फसगत नको
अत्यंत विषारी असलेला घोणस विनविषारी असलेल्या अजगराप्रमाणेच दिसत असल्याने लोकांची फसगत होवुन सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे घोणस व अजगर यांच्या अंगावरील नक्षीचे निरीक्षण करून फरक समजुन घ्यावा व सर्प अचुक ओळखुन पुढील आवश्यक खबरदारी घ्यावी.अजगरापेक्षा घोणस सर्पांची संंख्या तुलनेने निश्चितच खुप अधिक असते.पाठीवर असणार्या बदामी आकाराच्या एकसारख्या नक्षीवरून घोणस सर्प चटकन ओळखता येतो.
घोणसला असुरक्षीत वाटले तर तो लगेच दंश आजिबात करत नाही तर अगोदर कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करून पुर्वसुचना देतो. इतरांना त्याच्यापासुन दुर राहण्याबाबत तो चेतावणी देतो. असा आवाज ऐकुन वेळीच सावध होवुन त्वरीत सर्पमिञास बोलवावे व सर्पमिञ येईपर्यंत साप अधिक अडगळीत जावु नये याकडे लक्ष ठेवावे. तसेच घरपरिसरात वावर असलेल्या विशिष्ट ठिकाणी जर घोणस वारंवार निघत असतील तर त्या ठिकाणी डांबरगोळ्या किंवा थायमेट टाकावे त्या वासाने ते तिथुन दुर निघुन जातील. यासोबतच जर चुकुन पाय पडुन किंवा अचानक जोराचा धक्का लागल्यावर माञ घोणस आवाजासोबत लगेच दंश करण्याची शक्यता जास्त असते.
त्वरित उपचार द्या
कोणाला जर या सर्पाचा दंश झालाच तर कुठेही कसल्याही प्रकारे वेळ न दवडता रूग्णास त्वरीत नजीकच्या तालुका सरकारी दवाखाण्यात दाखल करावे व अॅन्टीवेनम प्रतिविषाची लस घेण्यास प्राधान्य द्यावे. जेवढ्या कमी वेळेत ही लस घेतली जाते तेवढे रूग्णाचे प्राण वाचण्यास व रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.
भारतात विषारी सर्पांचे जे जे मुख्य प्रकार सर्वञ आढळुन येतात त्या सर्वांची मिळुन एकच ॲंटीवेनम प्रतिविषाची लस सरकारी दवाखाण्यांमध्ये आता उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही विषारी प्रजातीच्या सर्पाचा दंश झाला तरी ती एकच लस रूग्णास दिली जाते. म्हणुनच सर्पदंशानंतर सापाच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी सापाला शोधण्यात त्याचे फोटो सोबत घेण्यात किंवा त्याला मारून सोबत घेण्यात आपला वेळ आजिबात वाया घालवु नये.
विष हृदयापर्यंत पोहचले की ..
सर्पविष हृदयापर्यंत पोहचले की ते शरीरभर पसरण्याचा वेग प्रचंड वाढतो त्यामुळे त्याचा वेग कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रथमोपचार केल्यास उत्तम.
सर्पदंश झालेला रूग्णाने घाबरून न जाता एका ठिकाणी स्वस्थ बसुन अथवा पडुन रहावे, धावपळ होवु देवु नये. दवाखाण्यात नेईपर्यंतच्या प्रवासात रूग्णाचा सर्पदंश झालेला भाग हृदयापासुन खालच्यापातळीला राहील असे रूग्णास ठेवावे. उदाहरणार्थ - जर सर्पदंश हाताला झाला असेल तर रूग्णास बेंचवर झोपवुन हात खाली लोंबकळत सोडावा. याबरोबरच सर्पदंशाच्या ठिकाणापासुन २ ते ३ इंच अंतरावर हृदयाकडे जाणार्या दिशेला त्या अवयवास रूमालाने आवळपट्टी बांधावी. सदर आवळपट्टी खुपच घट्ट अगर खुप सैल असु नये याची खबरदारी घ्यावी.
कटाक्षाने 'हे' टाळावेत
ब्लेडने शिरेला उभा छेद देवुन रक्तस्ञाव करणे किंवा सर्पदंशाची जागा तोंडाने शोषुन विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार कटाक्षाने टाळावेत. सर्पदंश झाल्यानंतर काही वेळाने तो दंश झालेला भाग व रूग्णाच्या संपुर्ण अंगावर सुज यायला सुरूवात होते. त्यामुळे त्याने घातलेले अलंकार,अंगठी,बांगड्या,करदोरा अशा गोष्टी त्याच्या अंगावरून त्वरीत काढुन घ्याव्यात.
NAJA हे होमिओपॅथी औषधाचे दोन थेंब सर्पदंश झालेल्या रूग्णाच्या जीभेवर ठेवल्यास रूग्ण बरा होतो अशी FAKE POST (खोटी पोस्ट) सोशल मेडियावरून वारंवार व्हायरल होत असते. परंतु NAJA हे होमिओपॅथि औषध हृदयरोगासंबंधीच्या काही आजारांसाठी बनवले गेलेले आहे. सर्पदंशाचा व NAJA या औषधाचा तसा तिळमाञ संबंध नाही. सर्पविष रूग्णाच्या हृदयावरही परिणाम करत असल्याने सर्पदंश झालेल्या रूग्णास या NAJA औषधाचा थोडाफार फायदाही होवु शकतो पण रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी फक्त आणि फक्त प्रतिविषाची लस लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे.
सर्पावरील प्रतिविषाची लस सर्पदंश झालेल्या रूग्णास वेळेत मिळावी यासाठी प्रत्येक शासकीय तालुका रूग्णालयात ती उपलब्ध करून ठेवणे आता बंधनकारक केलेले आहे. तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणुन आपण आपल्या तालुका रूग्णालयाशी कृपया संपर्क करून उपलब्धतेबाबत जरूर खाञी करून घ्यावी..!
एकावेळी सुमारे २५ ते ३५ सुदृढ पिलांचा जन्म देणारी प्रजाती
घोणस सापाची ही प्रजाती आपले अंडे निसर्गात न सोडता आपल्या शरिराच्या ओटीपोटातच उबवते त्यामुळे इतर सर्पांच्या तुलनेत घोणसचा जन्मदर व पिल्ले जगण्याचा दर यामध्ये खुप कमी तफावत असते त्यामुळे एकावेळी सुमारे २५ ते ३५ सुदृढ पिलांचा जन्म होतो. या सर्पाचे नुकतेच जन्मलेले पिल्लूही प्रौढ सर्पाइतकेच विषारी असते त्यामुळे लहान पिल्लापासुनही सावध रहाणे गरजेचे असते.
सर्पमिञांनी देखील घ्यावी काळजी
सर्पमिञांनी घोणस सापाला पकडतेवेळी व पुन्हा निसर्गात मुक्त करतेवेळी विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. इतर सर्पांच्या तुलनेत हा घोणस सर्प अचानकपणे व अचुक दंश करण्यात अत्यंत हुशार असल्याने याला थेट हात न लावता शक्यतो लांब काठीच्या सहाय्याने किंवा ट्रॅपर स्टिकनेच पकडावे. पकडलेला सर्प स्वत:कडे जास्त काळ न बाळगता कमीत कमी कालावधीत मुक्त करावा.
भरपुर अन्न, पाणी व स्वरक्षणासाठी शांत अशी अडगळीची जागा मिळाली तर असे साप तिथेच आपले बस्तान बसवतात. त्या परिसरातच राहतात व तिथुन शक्यतो स्थलांतर करत नाहीत. मिलनाच्या वेळी जोडिदाराच्या शोधासाठी, वातावरणात अचानक बदल झाल्याने अचानक अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने किंवा त्याच्या अधिवासाचे ठिकाण उध्वस्थ होणे अशा कारणांमुळे तो टप्प्याटप्याने ५ किलोमिटर पेक्षाही जास्त प्रवास करू शकतो. म्हणुनच अशा विषारी सर्पांना निसर्गात मुक्त करतेवेळी मनुष्यवस्ती व शेती परिसरापासुन दुर १० ते १५ किमीअंतरावरील निर्मनुष्य वनक्षेञात मुक्त करावे.
सर्पाचा स्पर्श झालेले सर्व साहित्य व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे व ते इतर कसल्याही कार्यासाठी वापरू नये व लहान मुलांपासुन नेहमी दुर ठेवावे. घोणस साप जोडिदाराच्या शोधार्थ बाहेर पडतेवेळी आपल्या शरिरातुन विशिष्ट तिव्र वासाचे स्राव आपल्या शरिरातुन नैसर्गिकरित्या सतत बाहेर सोडत असतो. ज्याच्या वासाने त्याला जोडिदार शोधणे सोपे होते.
त्यामुळे या सर्पाचा वावर झालेले ठिकाण किंवा त्याचा स्पर्श झालेले साहित्य स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते अन्यथा त्या स्रावाच्या वासाने त्या ठिकाणी परिसरातील दुसरे घोणस आपोआप आकर्षिले जातात. "सापाचा जोडिदार बदला घेण्यासाठी आपला पाठलाग करतो" या अंधश्रद्धेमागचे शास्ञीय कारण हेच आहे. या बरोबरच सर्प ठेवलेल्या पिशवीतुन सुटका व्हावी यासाठी पिशवीला केलेल्या दंशामुळे पिशवीला विष लागल्याची शक्यता खुप जास्त असल्याने हे साहित्य नष्ट करणे किंवा स्वच्छ करणे गरजेचे असते. सर्पमिञांचा या सर्पाशी सर्वात जास्त संपर्क येत असल्याने त्यांनी याबाबत स्वत:ची अधिक काळजी घ्यावी.
जयराम श्रीरंग सातपुते
निसर्गअभ्यासक
अहिल्यानगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुह
मो. ९६०४०७४७९६