गेल्या काही दिवसांपासून दाट धुके पडत आहे. यामुळे केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दररोजच्या या दाट धुक्यांमुळे आंबा मोहोर गळण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
टेंभुर्णीसह परिसरात मोठ्या प्रमाणात केशर आंब्याच्या बागा आहेत. यंदा परिसरात लवकरच हे आंबे मोहराने बहरले आहेत. त्यामुळे यंदा केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र, मागील एक महिन्यापासून अधून- मधून सारखे धुके पडत आहे. यामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून खाली पडत आहे. त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गजेंद्र खोत, शंकर खोत, माधवराव अंधारे, धीरज काबरा आदींनी केली आहे.
संबंधित-आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?
आंब्याच्या कैऱ्या काळवंडतात, पंचनामेही करावे
माझ्याकडे केशर आंबा बाग असून, यंदा मोठ्या प्रमाणात सर्वच आंब्याची झाडे मोहोराने लगडली होती. त्यामुळे काही आंब्यांना छोट्या कैाही लागल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसात परिसरात सारखे धुके पडत आहे. त्यामुळे आंब्याच्या कैच्या काळवंडत असून, मोहोर गळून खाली पडत आहे. विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे करून आंब्याचा त्वरित विमा मंजूर करावा.- नितीन अंधारे, आंबा उत्पादक शेतकरी, गणेशपूर
या गावात बागा
१. टेंभुर्णीसह परिसरातील निमखेडा, गणेशपूर, अकोला देव, दहिगाव, देळेगव्हाण, नळविहिरा, सातेफळ, पोखरी, आंबेगाव, डोणगाव, बुटखेडा आदी भागात मोठ्या प्रमाणावर केशर आंबा बागा आहेत. यंदा या बागा डिसेंबरमध्ये मोहोराने लगडल्या होत्या. सर्वच बागा मोहोराने लगडल्याने शेतकयांना मोठ्या उत्पन्नाची आशा होती.
२ मात्र, सततच्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, आता डोळ्यादेखत मोहोरगळ होत आहे.