Join us

भगवा डाळिंब का सरदार पेरू, कोणते कलम घ्यावे? इथे तयार होताहेत लाखो रोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 2:18 PM

बीड जिल्ह्याच्या शासकीय रोपवाटीकेत लाखोंच्या संख्येने रोपे तयार.. काय आहेत या कलमांची वैशिष्ट्ये?

भगवा डाळिंब, केशर आंबा, सरदार पेरूचे उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या बीड तालुक्यातील बिंदुसरा येथील शासकीय रोपवाटिकेत कलमे तयार करण्यात आली आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने रोपे तयार करण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच असून उच्च प्रतीच्या गुणवत्तापूर्ण रोपांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले.

बीड तालुक्यातील बिंदुसरा येथील शासकीय रोपवाटिकेत विविध फळझाडांची रोपे व कलमे तयार करण्यात आली आहेत.शासकीय फळरोपवाटिकेत कृषी पर्यवेक्षक बाबासाहेब राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने डाळिंब फळपिकाच्या भगवा वाणाची गुटी कलमे तयार करण्यात आली आहेत. तसेच आंबा केशर वाण, कोय कलम, शेंडा कलम, चिकू कालिपत्ती वाण, भेट कलम, पेरू सरदार ( एल ४९) दाब कलम, गुटी कलम पद्धतीने तयार करण्यात आलेली रोपे शासनाने निश्चित केलेल्या अल्पदरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

डाळिंबाच्या रोग व कीडमुक्त, जातिवंत व गुणवत्तायुक्त अशी गुटी

लखनौ कलमे शासकीय रोपवाटिका बिंदुसरा, बीड येथे प्रतिवर्षी लक्षांकाप्रमाणे तयार केली जात असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक राठोड यांनी दिली.शासकीय रोपवाटिकेत शेतकऱ्यांना उच्च प्रतीची रोपे, कलमे उपलब्ध करून देणे कृषी विभागाचे धोरण आहे. इतर खासगी रोपवाटिकेमध्ये न आढळणारी 'मातृवृक्ष' शासकीय रोपवाटिकेत उत्तम प्रतीची गुणवत्तापूर्ण मिळतात, हे वैशिष्ट्य आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

सरदार पेरू

भारतात अनेक राज्यांत पेरूची लागवड केली जाते. त्यापैकी उत्तर प्रदेशात जास्त लागवड होते,तर   महाराष्ट्रात सुूमारे  ३८ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. सरदार पेरू हे पेरूचे एक लोकप्रीय कलम. या जातीचा पेरू तयार होण्यास साधारण १०५ ते १३५ दिवस लागतात. थंडी अधिक असल्यास हे फळ येण्यास अधिक वेळ लागू शकतो.

भगवा डाळिंब

लाल चुटुक आणि साखरेएवढी गोड चव असणारे भगवे डाळिंब मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात पिकवले जाते. आकाराला छोटे बी आणि रसदार दाण्यांमुळे या कलमाला राज्यातून मोठी मागणी असते. हाडे मजबूत करण्यासाठी हे डाळिंब खाण्यास सांगितले जाते.

 

टॅग्स :फळेबीड