जमीन संबंधित जुने नकाशे, निवाड्याचे आदेश, इनाम वाटपाचे रजिस्टर, अकृषक आदेश, नझुल प्रकरणे, जन्म-मृत्यू नोंदी, लवाद निर्णय असे जुने आणि महत्त्वाचे महसुली दस्तऐवज सहज प्रणालीच्या (Sahaj System) माध्यमातून 'एका क्लिक'वर (one click) उपलब्ध होणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आता महसूल कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून आकारास आला असून, यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास या तिन्हींची मोठी बचत होणार आहे. (Sahaj System)
'सहज प्रणाली'चे औपचारिक लोकार्पण न्यायमूर्ती अनिल स. किलोर यांच्या हस्ते २३ मार्च २०२५ रोजी झाले. दरम्यान, "सहज प्रणालीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा," असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. (Sahaj System)
संगणकीकरणाचा सकारात्मक परिणाम
१ ऑगस्ट २०२४ महसूल दिनापासून जिल्ह्यातील सर्व महसुली शाखांचे संगणकीकरण सुरू करण्यात आले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, ते आता डिजिटल स्वरूपात सुरक्षित आहेत.
प्रमाणित प्रती कशा मिळणार?
आवश्यक दस्तऐवज निः शुल्क ऑनलाइन पाहता येणार आहेत. जर प्रमाणित प्रत हवी असेल, तर विहीत शुल्क ऑनलाइन भरून ती प्रत जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातून मिळवता येणार आहे.
दस्तऐवज शोधणे सोपे
यापूर्वी नागरिकांना जुने दस्तऐवज मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पुनर्वसन किंवा भूसंपादन शाखांमध्ये वेळखाऊ चौकशी करावी लागत असे. अनेक कागदपत्रे जुनी, जीर्ण किंवा हरवलेली असल्यामुळे प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होती. सहज प्रणालीमुळे आता नागरिक प्रकरणाचे वर्ष, पक्षकारांचे नाव, तालुका, गाव, निवाडा क्र. किंवा गट क्र. अशा तपशीलांच्या आधारे शोध घेऊ शकतात.
सहज प्रणालीचे ठळक फायदे
* जमीन व दस्तऐवजांची विनाविलंब उपलब्धता* नागरिकांची वेळ आणि पैशाची बचत* एआय आधारित प्रणालीमुळे सुलभ व जलद कामकाज* पारदर्शक आणि कार्यक्षम महसुली प्रशासन* न्यायालयीन प्रकरणांत शेतकऱ्यांना दस्तऐवज मिळविण्यास मदत* सरकारी योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध* महसुली अभिलेखांचे दीर्घकालीन संरक्षण
हे कागदपत्र मिळणार
जुने महसुली अभिलेख जसे जुने नकाशे, भुसंपादन निवाडा प्रत, अकृषक आदेश, इनाम जमीन वाटप रजिस्टर, जन्म-मृत्यु नोंद रजिस्टर, लवाद आदेश, नझुल प्रकरणे, प्रमाणित प्रत, नक्कल अशा विविध महसूल दस्ताऐवज येथे मिळणार आहे.
'सहज प्राणाली'साठी या वेबसाईटवर क्लिक करुन दस्ताऐवज मिळवता येईल.https://sahajpranali.safevaults.in/search