नवी मुंबई एपीएमसी परिसरात पाम तेलामध्ये वेगवेगळे रसायन मिसळून ब्रँडेड कंपन्यांच्या नावे शेंगतेल, राईचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. एपीएमसीमध्ये मागील काही महिन्यांपासून हा कारखाना चालवला जात होता. त्या ठिकाणच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
एपीएमसी आवारात गौतम ॲग्रो इंडिया नावाने तेल कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणी पाम तेलात इतर रसायन मिसळून नामांकित बँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. याची माहिती अन्न व औषध प्रशासन तसेच गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती.
एपीएमसी परिसरात तसेच विविध ठिकाणी विक्रीसाठी हे तेल पुरवले जात होते. मात्र, हलक्या दर्जाच्या पाम तेलात रसायन मिसळून बनवलेल्या या तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छापा टाकून तिथल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवालानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. नवी मुंबईतील मार्केटमध्ये चक्क रसायन मिसळून नामांकित बँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. या ठिकाणी छापा मारण्यात आला.
२० कामगार दिवसरात्र करत होते काम
मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच एपीएमसीमधील या कारखान्यावर छापा टाकला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पाम तेलात रसायन मिसळून बनवलेले शेंगतेल गुजरात, सोना व सौराष्ट्र या नावाने, तर राईचे तेल केशव ब्रॅण्डच्या नावाने विकले जात होते. भेसळ करण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बसवून कारखाना तयार केला होता. त्यामध्ये बाहेरून मागवलेले पामतेल ओतून त्यात वेगवेगळे रसायन मिश्रण करून ते डब्ब्यात भरले जात होते.