पुणे : सध्या आंब्याचा सीझन सुरू असून बाजारात मोठ्या प्रमाणावर कोकणातील हापूस आंब्याची आवक होताना दिसत आहे. आंब्याच्या प्रतीनुसार आणि त्याच्या आकारानुसार सध्या दर मिळत असून ७०० रूपये ते २ हजार रूपये डझनपर्यंत रत्नागिरी हापूस आंब्याची पुण्यात विक्री केली जात आहे. तर रत्नागिरी आणि देवगड वगळता इतर भागातूनही हापूस आंब्याची आवक होत आहे.
दरम्यान, सध्या इतर भागातून येणाऱ्या आंब्याचीही हापूसच्या नावाखाली विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. तर वरून फक्त बघून खरा हापूस आंबा ओळखता येत नसल्याने ग्राहकांचीही फसवणूक होताना दिसत आहे. म्हैसूर, कर्नाटकी, बंगळूर येथून हापूस आंब्याची आवक होत असून या आंब्याची ओरिजनल हापूस म्हणून विक्री होत आहे. तर रत्नागिरी-देवगड येथील हापूसपेक्षा कमी दरात मिळत असल्याने ग्राहकही या आंब्याची खरेदी करतात.
कसा ओळखाल खरा हापूस?खरा हापूस डोळ्यांनी ओळखणे कठीण असते त्यामुळे सुरूवातीलाच आंबा खरेदी करताना स्थानिक किंवा विश्वासू विक्रेत्याकडून खरेदी केला पाहिजे. तर आंबा पिकलेला असेल तर त्याच्या सालेवर सुरकुत्या पडलेल्या असल्या पाहिजेत. कापल्यानंतर हापूस आंबा केशरी रंगाचा तर इतर आंबे पिवळसर रंगाचे असतात. हापूस आंब्याचा वास येतो, कर्नाटकी हापूस आंब्याचा वास जास्त येत नाही. त्याचबरोबर हापूस आंब्याची चवही इतर आंब्यापेक्षा गोड असते. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन खरा हापूस आंबा ओळखला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांचे नुकसानइतर आंबे हापूसच्या नावाखाली विक्री होत असल्यामुळे ग्राहक महाग आणि खऱ्या आंब्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे खऱ्या हापूस आंब्याचे दर कमी होतात. परिणामी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. दरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांना हापूस आंब्याची एक पेटी पॅक करून बाजारात आणण्यासाठी तब्बल २५० रूपयांपर्यंत खर्च येतो.
यंदा केवळ २५ टक्के आंब्याला मोहोरयावर्षी कोकणातील केवळ २५ टक्के आंब्याला मोहोर आला असल्यामुळे येणाऱ्या काळात आंब्याची आवक घटेल अशी शक्यता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ यांनी सांगितले. आंब्याला मोहोर येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कल्टार या प्रेरकामुळे यंदा जवळपास ७५ टक्के आंब्याला मोहोर न आल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे यंदा आंबा हंगामाच्या उत्तरार्धात आंब्याची आवक घटण्याची शक्यता आहे.