Sankeshwar Sugar Factory news regarding debt संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावरील सध्याच्या ८१२ कोटींच्या कर्जाला कत्ती बंधूच जबाबदार आहेत. कर्जाचा बागूलबुवा दाखवून कारखाना दीर्घ मुदतीच्या कराराने चालवायला देण्याचा त्यांचा घाट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गैरकारभाराची चौकशी करावी आणि दोषींकडून कारखान्याच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.
[आज सोमवारी (२३) संकेश्वर कारखान्याची वार्षिक सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक म्हणाले, १९९५-९६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बसगौडा पाटील यांच्यावर खोटे आरोप करून कत्ती बंधूंनी कारखान्याची सत्ता बळकावली; परंतु सभासदांनी ज्या भावनेने/ हेतूने त्यांच्याकडे कारखान्याची सत्ता सोपवली, त्या हेतूलाच त्यांनी हरताळ फासला. आपल्याच नेतृत्वाखालील कारखाना कर्जाच्या खाईत लोटून स्वतःच्या मालकीचा खाजगी कारखाना उभा केला. आता कर्जाच्या डोंगराकडे बोट दाखवून कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे.
गड्यान्नावर म्हणाले, स्व. आप्पणगौडा पाटील यांनी उदात्त हेतूने केवळ सव्वाकोटीत हा कारखाना उभा केला. त्यांच्या तत्त्वानेच कारखाना चालवलेल्या मंडळींची बदनामी करून सत्तेवर आलेल्यांनी सभासद, शेतकरी व कारखान्याचे वाटोळे केले आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडेही दाद मागणार आहोत. यावेळी तमाण्णा पाटील, अण्णासाहेब पाटील, महादेव मोर्ती, अरुण शिंत्रे, धनाजी पाटील, अशोक पाटील, बसवराज मुत्नाळे आदी उपस्थित होते.
९ कोटींचे कर्ज... ८१२ कोटींवर पोहोचले ! १९९५-९६ मध्ये बसगौडा पाटील यांच्या कारकीर्दीत केवळ ९ कोटींचे कर्ज होते. त्यापैकी साखर तारण कर्ज ८४ लाख होते. आजमितीस कारखान्यावर ८१२ कोटी ४५ लाखांचे कर्ज आहे. त्यापैकी २७४ कोटी ८२ लाखांची परतफेड केली असून, साखर तारण कर्ज १६२ कोटी ८० लाख आहे. म्हणूनच, सभासदांनी कत्ती परिवाराला जाब विचारावा, असे आवाहन माजी मंत्री नाईक यांनी केले.