मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती देण्यात येत असून 2023- 24 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त्यसंस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतील? अर्ज कसा व कुठे करावा? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया...
सारथी शिष्यवृत्ती काय आहे?
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी, दहावी,अकरावी या वर्गातील मराठा, कुणबी, कुणबी -मराठा व मराठा- कुणबी या गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमाह ८०० रुपये प्रमाणे वर्षाला 89 हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
काय आहे पात्रता?
- सारथी शिष्यवृत्ती २०२३-२४ चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या वर्गात शिक्षण घेत असावा.
- या शिष्यवृत्तीचा लाभ मराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी–मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
- राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
- NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मात्र समजण्यात येईल.
- इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये 55% टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे. इयत्ता १० वी व ११ वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000/- पेक्षा कमी असावे.
कोण ठरेल अपात्र?
- विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
- सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
- छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी आवेदन करताना विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
- मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
- विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत.
- विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुक च्या पहिल्या पानाची सत्य प्रत ( नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
- इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
- इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
- NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/ निकाल पत्रक.
- अन्य् अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.
कुठे कराल अर्ज?
शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाइन लिंक वर माहिती भरता येते.
- गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
- माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र ४११००४ या पत्त्यावर सादर करावे.