सातारा : यंदा कमी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण काही दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांतसुद्धा दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून हिवाळ्याच्या महिन्यातच पाण्याची दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. पाणी नसल्यामुळे पीके वाळून गेली आहेत तर काही ठिकाणी जनावरांना प्यायला पाणी नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, माण खटाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असूनसुद्धा येथे दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. मात्र येथील दुष्काळी परिस्थितीच्या झळा शेतकऱ्यांना आणि सामान्य नगरिकांना सहन कराव्या लागत आहेत. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले हरभरा, ज्वारीसारखे पिके वाळून जायला लागली आहेत. तर विहिरीच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. उन्हाळाचे दिवस सुरू होण्याआधीच ही परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांपुढे उन्हाळ्याचे मोठे संकट उभे आहे.
पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठापावसाळ्यातसुद्धा अनेक गावांत पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे खटाव तालुक्यातही अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक नागरिक खासगी टँकरने पाणी घेतात. नद्या, तलाव आणि तळे आटले असून शेतात चरायला जाणाऱ्या जनावरांनासुद्धा पिण्याच्या पाण्याची वाणवा झाली आहे. येणाऱ्या काळात पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे.
ज्वारी वाळून गेलीये, पाऊसही वेळेवर पडला नाही आणि प्यायलाही पाणी नाही. विहिरीलासुद्धा आता पाणी थोडंच शिल्लक राहिलंय. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जातोय तो कुणास ठाऊक? गावात पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत. - कोंडाबाई बागडे (महिला शेतकरी, खटाव)
जनावरे चरायला सोडली तर त्यांना घरीच पाणी पाजावे लागतात. दिवसभर शेतात कुठंच जनावरांना प्यायला पाणी नाही. सकाळी पाणी पाजल्यानंतर जनावरांना थेट संध्याकाळी पाणी पाजावं लागतंय अशी अवस्था या परिसरात झाली आहे. हिवाळ्यातच उन्हाच्या झळा लागत आहेत त्यामुळे यंदाचा उन्हाळा कठीण जाणार आहे.- रामा शिंदे (शेतकरी, तडवे, ता. खटाव)