पुणे : खरीप पीककर्ज तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सातबारा आणि आठ अ उतारे काढावे लागत आहेत. मात्र, ही सुविधा आता ऑनलाइन असल्याने तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही.
त्यामुळेच राज्यात बुधवारी (दि. २६) एका दिवसात सुमारे तीन लाख उतारे डाऊनलोड करण्याचा विक्रम घडला. यातून महसूल विभागाला तब्बल ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
राज्यात सप्टेंबर २०१९ पासून सातबारा उतारे ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तत्कालीन जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम व राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या प्रयत्नांतून ही संकल्पना राबविण्यात आली.
यासाठी महाभूमी या पोर्टलवरून सातबारा, आठ अ, मिळकत पत्रिकांचे उतारे सहज डाऊनलोड करता येतात. महाभूमी पोर्टलवरून बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत सुमारे २ लाख ९३ हजार ९०० सातबारा, आठ अ, मिळकत पत्रिकांचे उतारे डाऊनलोड करण्यात आले.
त्यातून महसूल विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक उतारे डाऊनलोड करण्याचा हा एका दिवसातील उच्चांक ठरला आहे. यात २ लाख २ हजार ८०० सातबारा, ७६ हजार ६०० आठ अ, ८ हजार ६०० फेरफार तसेच ५ हजार ९०० मिळकत पत्रिका आहेत.
राज्यातील स्थिती १ एप्रिल ते २६ जूनपर्यंत
सातबारा उतारे - ६२,४९,९००
आठ अ - २२,१७,०००
फेरफार - ३,७१,०००
मिळकत पत्रिका - ३,२७,८००
महसूल - १६ कोटी २० लाख रुपये
अधिक वाचा: Ladli Behna Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी जाणून घ्या सविस्तर