Saur Krushi Pump Yojana :
रामेश्वर काकडे
नांदेड :शेतीला अखंडित वीज मिळावी, यासाठी महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान कुसुम सौर कृषीपंप योजनेंतर्गत नांदेड विभागातील परभणी, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यात तब्बल १० हजारांहून अधिक शेतकरी वीज निर्माते झालेत. त्यामुळे तांत्रिक अडथळ्याविना कृषीपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करणे शक्य होतोय.
यापूर्वीही मेडा आणि महावितरणतर्फे अटल सोलार व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत नांदेड विभागातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत शेतात सौर पॅनल बसविले आहे. एकाच फिडरवर अनेक कृषीपंप असल्याने महावितरणलाही पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यासाठी नाकीनऊ येते.
पण, सौरपंप घेतलेल्या शेतकऱ्यांची नेहमी वीज गुल होण्याच्या कटकटीपासून मुक्तता झाली आहे. शेतीला ओलीत करण्यासाठी चोवीस तास वीजपुरवठा देणे महावितरणला शक्य होत नव्हते. त्यामुळे विशिष्ट तास ठरवून त्या वेळातच थ्री फेज पुरवठा केला जात आहे. एकाचवेळी सर्वांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला अनेक अडचणी येतात.
सौर कृषी पंप योजनेमुळे विजेचा भार कमी होणार असून शेती सिंचन वाढविण्यासाठीही मदत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत १२ हजार ९४० शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ९ हजार ७६१ अर्ज मंजूर करण्यात आले असून ७ हजार ६०९ शेतकऱ्यांनी शेतकरी हिश्याची ५ ते १० टक्के रक्कम महावितरणकडे भरली. त्यापैकी जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी सौर पॅनल सुरू केले.
परभणी जिल्ह्यात या योजनेसाठी १६ हजार ४७० शेतकऱ्यांनी अर्ज केले असून जवळपास १४ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. त्यातील १३ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी हिश्याची रक्कम भरली असून अंदाजे साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांनी कृषीपंप सुरू केले. हिंगोली जिल्ह्यात १२ हजार ४२५ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले असून १० हजार ८३८ अर्ज मंजूर केले. त्यातील जवळपास तीन हजारांवर शेतकऱ्यांनी सौर पॅनल सुरू केले.
...असे आहे अनुदान
• सौर पॅनल घेण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के तर एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ५ टक्के रक्कम भरायची आहे.
• खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तीन एचपी पंप २४ ते २५ हजार, पाच एचपी ३२ हजार तर साडेसात एचपी पंपासाठी ४२ हजार भरायचे आहेत.