जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (जालना-२) यांच्या वतीने शुक्रवारी (दि. ०३) रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी बदनापूर तालुक्याच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अश्विनी डामरे होत्या. तसेच बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय बदनापूरच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. क्षमा अनभुले, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, बदनापूर देवानंद वाघ, यांची विशेष उपस्थिती होती.
सदरील महिला शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या आजच्या सावित्रीच्या लेकी संजीवनी अशोक जाधव, शर्मिलाताई शिवाजीराव जिगे, रुपाली नितीन निकम, अल्का गंगाधर गायकवाड, सरिता बळीराम काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. क्षमा अनभुले यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उपस्थित महिला भगिनींना समजावून सांगितला. सावित्रीबाई यांनी समाजात रुढ असलेल्या अंधश्रद्धा, बालविवाह, सतीप्रथा यांसारख्या कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांच्या विरोधात लढा दिला. तसेच त्यांचे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डामरे यांनी म्हटले की सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रियांच्या जीवनात मोठा बदल घडून आला आहे. आज महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण या बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच प्रयत्नांचे फळ आहे. आजच्या घडीला आपल्या समाजात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अनुसरून शिक्षणास प्राधान्य देऊन आपण समाजातील समस्या दूर करू शकतो. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याने आपल्याला प्रेरणा मिळते.
त्यामुळे त्यांच्या विचारांचा अनुसरून आपणही समाजात चांगले बदल घडवून आणू शकतो. परंतु, आज आधुनिक क्रांतीज्योती सावित्री घडविण्यासाठी सर्व पुरुषांनी महात्मा ज्योतिबांच्या भूमिकेत राहून आधुनिक सावित्रीची पाठराखण करणे गरजेचे आहे.
या मेळ्यात महिला शेतकऱ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विकासच्या संरक्षण अधिकारी मिनाक्षी शिंदे, पर्यवेक्षिका संगीता उत्तम अंभोरे आणि कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. कदम, डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. एफ. आर. तडवी, डॉ. डी. बी. कच्छवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल कदम यांनी तर आभार डॉ. अश्विनी बोडखे यांनी व्यक्त केले.