राजाराम लोंढेकोल्हापूर : पाऊस कमी झाल्यामुळे यंदा राज्यभरातील सर्वच साखर कारखान्यांना ऊस टंचाईची धास्ती वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वर्षीपेक्षा जास्तच गाळप झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ४० सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदा सरासरी १२० दिवसच हंगाम चालला असून, २ कोटी ४० लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख ५१ लाख टनांनी गाळप वाढले. एकूणच राज्याचे गाळपही वाढले असून, सरासरी साखरेच्या उत्पादनात १८ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. यंदा मान्सून कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका सर्वच खरीप पिकांना बसला. उसालाही त्याची झळ पोहोचणार, हे निश्चित होते.
अधिक पाण्यावरील पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. त्यामुळे पाणी कमी मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. परिणामी, कोल्हापूर विभागातील सर्वच कारखानदार ऊस टंचाईच्या चिंतेत होते. सर्वांनी तोडणी यंत्रणा वाढवून ऊस उचलण्यासाठी गडबड केली.
साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढेच कोल्हापूर विभागातील कारखाने सुरू झाले. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम लांबला. पाण्याची टंचाई आणि उसाची उपलब्धता यामुळे कारखान्यांनी यंदा दबकतच हंगाम सुरू केला.
गेल्या चार महिन्यांत सर्वच कारखान्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक गाळप केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी १ कोटी ५१ लाख २५ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ८८ लाख ७५ हजार टन, असे २ कोटी ४० लाख टनांचे गाळप केले आहे.
एकरी उत्पादनात वाढपाऊस कमी व संभाव्य पाणीटंचाई यामुळे सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाने हेक्टरी उत्पादन कमी धरले होते; पण जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ९३ टन उत्पादन होते. त्यात वाढ होऊन ते ९८ टनांपर्यंत गेल्याने गाळपाचा आकडा फुगल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
साखरेचे दर घसरण्याची भीतीयंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होईल, म्हणून केंद्र सरकारने उसाच्या रसापासून अथवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती बंद केली. मळीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली. मात्र, साखरेचे उत्पादन वाढल्याने आगामी काळात दर घसरण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.