केंद्र शासनाने पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा साकारून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील १५१५ शाळांमध्ये परसबागा साकारण्यात आल्या आहेत. पुढील काळात या परसबागांमधील पालेभाज्यांचा त्या शाळेतील पोषण आहारात वापर होणार आहे. तसेच इतर शाळांमध्येही या बागा फुलवण्यात येणार आहेत.
यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर परसबाग स्पर्धेचे आयोजन केले असून उत्कृष्ट उपक्रमास बक्षीसही देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण, आहारतज्ज्ञ, कृषी, आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी, स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शाळांना नजीकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थाम, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी, कृषितज्ज्ञ यांचे उत्कृष्ट तालुकास्तरावर मार्गदर्शन घेता येणार आहे.
दोन हजारांपासून अकरा हजारांपर्यंत बक्षिसे
तालुकास्तरावर प्रथम ५ हजार, स्पर्धेचे द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये तसेच प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर १ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपये तर प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर २ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
राज्यस्तरावर प्रथम ५५ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार रुपये तर प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर ११ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहभागातून या परसबागा उभारण्यात येणार आहेत. शेतकरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. यामुळे शाळेत मिळणारा पोषण आहार आता सकस आहार मिळणार आहे. १५१५ शाळांत परसबाग उपक्रम राबवण्यात येत आहे. पुढील काळात सर्वच शाळांत तसे नियोजन आहे. तर पोषण आहार बनिवण्यासाठी शाळांमधून स्पर्धा घेण्यात येत आहेत. यातून कुशल आचारीही मिळतील.-पुनीता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी