सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस असा बरसतो की त्यामुळे पिकांचे नुकसानच अधिक होते; मात्र पाण्याची कमतरता भरून निघते. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याला परतीच्या पावसाचा अनुभव असल्याने यंदाही परतीच्याच पावसावर भरवसा असला तरीही दुष्काळाच्या तयारी लागा, असे संकेत शासनाकडून मिळू लागले आहेत. यासंदर्भात राज्याचे सचिव तसेच मदत व पुर्नवसन विभागाकडून जिल्हा प्रशासनाशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली जात आहे.
हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज फोल ठरवत यंदा पावसाने संपूर्ण जिल्ह्याला चिंतेत टाकले आहे. या हंगामात सहा वेळा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी पावसाने हुलकावणी दिली. जिल्ह्यात अवघे ५६ टक्के इतकाच पाऊस झाल्याने चिंता आहेच; परंतु ही आकडेवारी समांतर नसून काही तालुक्यांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे वाढली आहे; परंतु नऊपेक्षा अधिक तालुके कोरडे असल्याने जिल्ह्याची चिंता अधिक वाढलेली आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून घसरत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीनंतर पाटबंधारे विभागाला पिण्याच्या पाण्याचे नियोजनाची सूचना करण्यात आलेली आहे. चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकणार आहे. आता चार पुढील दोन-चार महिने पुरणार असला तरी रब्बीत होणाऱ्या चाऱ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच कसा राहील, यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय कृषी विभागाला देखील पीक नुकसानाचे पंचनामे, तसेच विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीच्या निकषावर अधिक काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागील आठवड्यात पालकमंत्र्यांनी टंचाई बैठक घेतल्यानंतर राज्य शासनाच्या विविध विभागांनी आता आढावा घेणे सुरू केले आहे. त्यानुसार सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
लोकप्रतिनिधींकडूनच दुष्काळाची मागणी- जिल्ह्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आपण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.- ज्या तालुक्यांमध्ये जलस्रोत आटले आहेत तेथील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्याने तेथील लोकप्रतिनिधी देखील दुष्काळाची मागणी करण्याची शक्यता आहे.
आशा पल्लवित..हवामान खात्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकयांच्या अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत. जिल्ह्यातील काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे.