पुणे : खरिपाची चाहूल शेतकऱ्यांना लागली असून अनेक शेतकरी खरिपाच्या पेरणी आणि लागवडीसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवत आहेत. तर यामध्ये अनेकदा भेसळयुक्त खते आणि बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. तर कापूस बियाणे विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने कापूस बियाण्यांच्या विक्रीवर १५ मे पर्यंत निर्बंध घातले असून १५ मे नंतर कापूस बियाण्यांच्या विक्रीला सुरूवात होणार आहे.
महाराष्ट्रात खरिपात सोयाबीन, कापूस, भात, मका, बाजरी, मूग, उडीद आणि इतर कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे बियाणे खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, महाबीज मार्फत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेमध्ये तेलबिया पिकांचे अंदाजे ७६००० क्विंटल, कडधान्य पिकांचे २४००० क्विंटल, भात पिकाचे १०००० क्विंटल बियाणे प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत वितरित करण्यात येणार आहे. ग्राम बिजोत्पादन योजनेमध्ये सन २०२४-२५ मध्ये भात व सोयाबीन पिकाचे अंदाजे ९२७०० क्विंटल बियाणे वितरित करण्यात येणार आहे.
सोयाबीन पिकाचे अंदाजे एकूण क्षेत्र ५० लाख हेक्टर असून मागील वर्षी प्रमाणे घरचे बियाणे मोहीम राबविण्यात आली असून ४ लाख २४ हजार ६६९ शेतकऱ्यांकडे ४१.६१ लाख क्विंटल बियाणे राखून ठेवले आहे.
सन २०२० ते २०२३ या कालावधीत केंद्र शासनाच्या कृषी उन्नती योजनेंतर्गत ३९ शेतकरी उत्पादक कंपनी यांना बीज प्रक्रिया केंद्र व गोडाऊनचा लाभ देण्यात आला असून त्यांचे मार्फत बियाणे उत्पादन व विक्रीचे काम सुरू आहे. तसेच राज्यात सोयाबीन व इतर पिकांच्या उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके मोहीम स्वरूपात कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे.
बियाण्याची खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
- गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्या.
- बनावट / भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा. पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील (जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपुर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी) नमूद करावे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी.
- खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
- खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.
- भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करा.
- बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतिम मुदत पाहून घ्या.
- कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.