राज्यातील बिजोत्पादन कार्यक्रमात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने तसेच, शेतकऱ्यांचा बिजोत्पादन कार्यक्रमातील सहभाग कायम राखण्याच्या दृष्टीने दिनांक १७ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित आधारभूत किंमत (MSP) यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतची योजना सन २०१८-१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान, राज्यातील बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती आधारीत दर व पीकनिहाय शासन घोषित MSP यातील फरकाची रक्कम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्या मार्फत सन २०२२-२३ मध्ये बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करणेसाठीच्या कृषी आयुक्तालयाच्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यासाठी ४ कोटी १२ लाखांचा निधी सन २०२१-२२ मधील बिजोत्पादक शेतकऱ्यांकरिता वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच, सन २०२२-२३ मधील बिजोत्पादक शेतकऱ्यांकरिता १३ कोटी ३८ लाख निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर उर्वरित ४ कोटी ८९ लाख निधी वितरीत करण्याकरिता कृषि आयुक्तालयाने केलेल्या विनंतीनुसार वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे.
सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला व राष्ट्रीय बीज निगम यांचेमार्फत बिजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समिती आधारीत दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत (MSP) यामधील फरकाची रक्कम देणेसाठी रु. ४८९.२१ लाख इतका निधी सन २०२३-२४ या चालू वर्षीसाठी वितरीत करण्यात येणार आहे.
अटी व शर्ती
१. सदर निधी P.L.A. / बँक खात्यांमध्ये ठेवला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
२. या प्रित्यर्थ होणारा खर्च हा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात येऊन उपरोक्त लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
३. कृषि उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत (MSP) फरकाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बिजोत्पादक शेतकऱ्यांच्या आधारलिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी.
४. वितरीत करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे.