लातूर जिल्हा परिषद सेस फंडातून स्लरी फिल्टर, बीज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे, तसेच रब्बी, हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करावेत. त्यानुसार ३१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. अर्जातून काही बाबींचा लक्ष्यांक पूर्ण होत नसल्याने नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. या आवाहनानंतर येणाऱ्या अर्जाची नव्याने सोडत काढली जाईल व त्यांची ज्येष्ठताही माहे ३१ जुलै २०२४ पर्यंत आलेल्या अर्जानंतर अनुक्रमांकानुसार लावली जाईल.
योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प अत्यल्पभूधारक व महिला यांना प्राधान्य राहील. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून ही योजना राबविण्यात येणार आहे. डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाणार आहे.
या कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक...
• इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्याचे जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतींसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत.
• लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. खरेदी करावयाची औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ते बी.आय.एस. अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असावे लागेल.
हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक...
रब्बी हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ, एक हेक्टरच्या मर्यादित देण्यात येईल व याचा पुरवठा पंचायत समिती स्तरावरून करण्यात येईल. इच्छुक शेतकऱ्यांनी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व लातूर कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.