Seed Treatment : पेरणी करण्यापूर्वी शेतकरी बियाणांवर बीजप्रक्रिया करतात. बीज प्रक्रिया हे पेरणीपूर्वी केले जाणारे महत्त्वाचे काम असून यामुळे पिकांच्या उत्पादनात आणि रोगांच्या प्रादुर्भावात फरक पडतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांवर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, बियाणांवर जैविक खतांची किंवा रासायनिक औषधांची केली जाणारी प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय. रासायनिक बीजप्रक्रिया व जैविक बीज प्रक्रिया असे दोन बीजप्रक्रियेचे प्रकार आहेत. आधी रासायनिक आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया केली जाते. रासायनिक बिजप्रक्रियेमुळे रोगांवर नियंत्रण आणि जैविक बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ होते.
रासायनिक बीज प्रक्रिया
बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणांमध्ये मिसळवून चोळून घ्यावे. त्याबरोबरच खोडमाशी, मावा, तुडतुडे या कीटकांच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम ७.५ मिली प्रती १० किलो बियाणांमध्ये मिसळवून चोळून घ्यावे. ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे सावलीत सुकवण्यासाठी ठेवावे आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. केवळ रासायनिक बीजप्रक्रिया करूनही पेरणी करता येऊ शकते.
जैविक बीज प्रक्रिया
रासायनिक बीज प्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू खतांची प्रतिकिलोनुसार बीज प्रक्रिया करावी. या बीज प्रक्रियेमुळे पिकांच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होते.