कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावे याकरिता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांचा पेरणी खर्च कमी होण्याच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून दिले जाते; परंतु बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनांबाबत माहितीच मिळत नसल्याचे काही शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर समोर आले असून, यासाठी योजनांची जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरजही व्यक्त होत आहे.
भूम तालुक्यातील ६० टक्के शेतकऱ्यांचा प्रपंच शेतीवर चालतो. त्यात कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे सोयाबीन असल्याने याकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. यामुळे यंदा ४६ हजार हेक्टरवर सोयाबीन या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रपंच शेतीवर अवलंबून आहेत. त्यात निसर्गाचा लहरीपणा उद्भवल्यास पेरलेले पीक पदरात यायच्या वेळेस कित्येक वेळेस तोंडाला आलेला घास निसटून वाया गेला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी आधीच उसनवारी करून बी-बियाणांची जुळवाजुळव केलेली असते. दरम्यान, पेरणी केलेले पीक वाया जात असल्याने सतत शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना सवलतीत बियाणे मिळावे याकरिता शासनाच्या वतीने अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, अन्न व पोषण सुरक्षा अभियान, ग्राम बीजोत्पादन अशा योजना राबविल्या जातात; परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी याची माहिती नसल्याने सवलतीद्वारे मिळणारे बियाणे गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कृषी कार्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त गावात जाऊन याबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
काय आहे योजना?
अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध बियाणांवर प्रतिकिलो सबसिडी देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च कमी होतो.
कोणत्या बियाणांवर किती मिळतेय अनुदान ?
सोयाबीन ३० किलो बियाणाच्या पिशवीवर ६०० रुपयांपर्यंत, उडीद ५ किलो पिशवीवर २५० रुपये, मूग पाच किलो पिशवीवर १२५ रुपये व तुरीच्या बियाणासाठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येते.
किती बियाणे केले वाटप ?
तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शासनामार्फत सवलतीच्या दरात विविध बियाणे उपलब्ध करून दिले जात आहेत, यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातून याचे परमिट दिले जात आहेत. शेतकऱ्यांनी कार्यालयात भेट देऊन हे परमिट घेऊन जावेत.
शासनाच्या वतीने अनुदानित बियाणे या योजनेंतर्गत कृषी कार्यालयाच्या वतीने आजपर्यंत खरीप हंगामामध्ये तूर ३०, उडीद ४५, सोयाबीन ३९५ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे - अतुल ढवळे,तालुका कृषी अधिकारी
मी अनेक वर्षांपासून शेती करतो; पण आजपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळते, याबद्दल मला कसलीच माहिती नव्हती. यामुळे कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांबाबत जास्तीत जास्त जनजागृती करणे गरजेचे आहे.- रवी नाईकवाडी, शेतकरी, भूम
शासन महाबीज या कंपनीचे बियाणे सवलतीच्या दरात देते; परंतु हे बियाणे अनेक शेतकरी वापरत नाहीत. यामुळे शासनाने शेतकरी ज्या बियाणांची मागणी करतील त्या बियाणांवर सवलत दिल्यास याचा फायदा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना होईल.- महेश बागडे, शेतकरी
१०४४ शेतकऱ्यांनी केले होते ऑनलाइन अर्ज
भूम तालुक्यातील ९६ गावांमधून खरीप हंगामातील विविध बियाणे मिळण्यासाठी १ हजार ४४ शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. या सर्व शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाच्या वतीने सवलतीचे बियाणे देण्यात आल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.