Lokmat Agro >शेतशिवार > हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

शेअर :

Join us
Join usNext

दोडामार्ग: काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरीमहिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

शुभांगी पांडुरंग गवस (६०), असे तिचे नाव असून, तिला उपचारासाठी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. हत्तींच्या पायदळी संसाराची धूळधाण होताना पाहून तिला जबर धक्का बसल्याने तिची ही अवस्था झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

रानटी हत्ती आता शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहेत. पूर्वी जंगलात राहणारे हत्ती आता तर थेट लोकवस्तीत येऊन धुडगूस घालत आहेत. मोर्ले, केर, घोडगेवाडी, तेरवण-मेढे आदी परिसरात सध्या या हत्तींचा वावर आहे. या भागातील शेतकऱ्यांनी फुलविलेल्या केळी, सुपारी आणि माडांच्या बागा उद्ध्वस्त करण्याचे काम हत्ती करत आहेत. त्यामुळे इथला बळीराजा देशोधडीला लागला आहे.

एक माड वर्षभर एका माणसाला पोसतो एवढे उत्पन्न त्याच्याकडून मिळते असे बोलले जाते. म्हणूनच तर शेतकरी कल्पवृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र दिवस रात्र घाम गाळून पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेल्या कल्पवृक्षाच्या बागा स्वतःच्या डोळ्यादेखत हत्तींकडून नेस्तनाबूत होताना पाहून डोळ्यातले अश्रू मनगटाने पुसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

असाच एक प्रकार मंगळवारी मोर्ले येथे घडला. येथील शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस या आपल्या बागेत गेल्या होत्या. यावेळी त्यांना बागेतील माडाची झाडे हत्तींनी उन्मळून खाली पाडल्याचे व बागायतीचे नुकसान केल्याचे दिसले.

यापूर्वीही या बागेत हत्तींनी धुडगूस घालून मोठे नुकसान केले होते आणि आता तर उरले-सुरले माड ही भुईसपाट केले. परिणामी त्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्या बागेतच बेशुद्ध पडल्या. त्यांना त्यांच्या सुनेने तातडीने साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तिथे उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. हत्ती शेतकऱ्याच्या मुळावर उठले असताना निगरगठ्ठ सरकार हत्ती पकड मोहीम राबविण्यावर शिक्कामोर्तब करत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

भविष्याच्या चिंतेने शेतकरी हृदयविकारग्रस्त ?
• तिलारी खोरे बागायतीसाठी सुपीक मानले जाते. त्यामुळे या भागात पिढ्यान्पिढ्या शेती आणि बागायती केली जाते. तरुण वर्गही नोकरी नसल्याने हताश न होता बागायती करून आपला उदरनिर्वाह चालवितात, एकंदरीत काय तर इथल्या शेतकऱ्यांचा उभा संसारच या बागायतींवर चालतो. मात्र गेल्या काही वर्षात या संसारावरच नांगर फिरविण्याचे काम जंगली हत्तींनी केले आहे. रात्रीचा दिवस करून उभ्या केलेल्या बागा हत्ती डोळ्यादेखत भुईसपाट करताना अगतिकपणे पाहण्याखेरीज शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहत नाही.
• त्यामुळे भविष्याच्या विवंचनेने इथला भूमिपुत्र पुरता कोलमडला आहे. माय-बाप सरकार यावर उपाययोजना करत नाही, मग पुढे करायचे काय? आणि खायचे तरी काय? हा प्रश्न त्याला भेडसावत आहे. अनेकांना हा धक्का पचविता येत नसल्याने शेतकऱ्यांना हृदयविकारासारखा आजार होण्याची शक्यता आहे. मोर्लेत घडलेली ही घटना त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याअगोदर वन विभागाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.