Join us

हवी ती भाषा निवडा अन् डाऊनलोड करा सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 2:00 PM

'भूमी अभिलेख' तर्फे ट्रान्सलिटरेशन टूल विकसित : भाषाही निवडता येणार

जमिनीशी संबंधित सर्वांत महत्त्वाचा कागदपत्रांचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा. मात्र, राज्यात यापूर्वी केवळ मराठीतूनच सातबारा उतारा दिला जात होता. राज्यात वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहत असल्याने त्यांना त्यांच्या भाषेत हा उतारा कळावा यासाठी आता २४ भाषांमध्ये सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा स्वरूपाचा उपक्रम देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने राबवला आहे.

राज्यात सुमारे २ कोटी ६२ लाख सातबारा उतारे उपलब्ध आहेत. त्यात सुमारे चार कोटी खातेदार आहेत. या २ कोटी ६२ लाख सातबारा उताऱ्यांपैकी २ कोटी ५८ लाख सातबारा उतारे चालू आहेत. अर्थात त्यावर फेरफार नोंदी व अन्य कामकाज सुरू असते. त्यामुळे हा आकडा मोठा आहे. राज्यात अन्य भाषिक नागरिक देखील राहत आहेत. अनेक ठिकाणी ते जमिनीचा व्यवहार करत असतात. मात्र, आजवर बहुतांश राज्यांमध्ये आपापल्या भाषांमध्ये सातबारा उतारा दिला जात होता. त्यामुळे इतर भाषिकांना उताऱ्यावरील तपशील समजण्यास अडचण येत होती. अनेकदा उतारयावरील तपशील न समजल्याने फसवणूकही होत होती. मात्र आता त्याला आळा बसणार आहे. कारण केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड ॲक्शन प्रोग्रामनुसार हा सातबारा उतारा अन्य भाषांमध्ये देखील असावा असे सुचविले. त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार सातबारा उतारा २४ भाषांत उपलब्ध होत आहे.

विविध भाषांमध्ये सातबारा उतारा उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक जमीन मालकाला सातबारा उताऱ्यामधील माहिती नेमकेपणाने कळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरुन ऑप्शनमध्ये भाषा निवडल्यास संबंधिताला त्याच्या भाषांमध्ये सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे. -सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान, भूमी अभिलेख व जमाबंदी विभाग, पुणे.

ट्रान्सलिटरेशन व ट्रान्सलेशन दोन्ही

• भूमी अभिलेख व जमाबंदी विभागाने यासंदर्भात सीडॅक या सरकारी संस्थेकडून ट्रान्सलिटरेशन टूल विकसित करून घेतले. उतारा संबंधित भाषेत भाषांतरीत करताना जसाच्या तशा शब्दांसह शब्द लिहिणे अर्थात ट्रान्सलिटरेशन करण्यात आले. तसेच ट्रान्सलेशन अर्थात भाषांतरही करण्यात आले.

  • उदाहरणार्थ एखाद्या गावाचे नाव चौकोणवाडी आहे. त्याचे शब्दश: भाषांतर स्वचेअरवाडी असे होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी ट्रान्सलेटेशन टूल वापरण्यात आले. अशी नावे जशाच्या तसे सातबारा उताच्यामध्ये उपलब्ध झाली. 
  •  मात्र, उताऱ्यातील काही रकान्यांमध्ये कब्जेदाराचे नाव, खाते उतारा अशा स्वरूपाचे शब्द मात्र, भाषांतरीतच करण्यात आले. जेणेकरून संबंधित भाषकांना त्याचा अर्थ काय आहे हे कळणे सोपे झाले. 

• महाराष्ट्रात आता मराठी इंग्रजी हिंदीसह सुमारे २४ भाषांमध्ये सातबारा उतारा उपलब्ध झाला आहे. देशात महाराष्ट्राने या प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेतला आहे. मध्य प्रदेश व पंजाब राज्यानेही यासंदर्भात कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनपीकतंत्रज्ञान