पारंपरिक शेतीला दुधव्यवसायाची जोड कशी द्यायची? स्वयंरोजगार कसा मिळवायचा? आर्थिकदृष्ट्या शेतीतील संधी अशा अनेक विषयांचे आकर्षण असणारे यंदाचे नाशिक जिल्ह्यात भरणारे कृषी प्रदर्शन २४ ते २८ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, " लाखो शेतकरी, सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, कृषी अभ्यासक, संशोधक, व्यापारी, संस्था, लहान मोठे उद्योजक हे वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत असतात. दरवर्षी होत असलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं की गत दोन महिन्यात नंदुरबार येथे सेवामार्गाच्या वतीने विभागीय कृषी महोत्सव संपन्न झाले. या महोत्सवांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली.
या सर्व वातावरणनिर्मिती मुळे नाशिक महानगरात होणाऱ्या या जागतिक कृषी महोत्सवात पाच दिवसात भारतभरातील लाखोच्या संख्येने शेतकरी, कृषी अभ्यासक, व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच बाहेर देशातील ही हजेरी लावतील असा विश्वास कृषी महोत्सव, आयोजक आबासाहेब मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रकांतदादा मोरे, व्यवस्थापक, गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते, भाजप, सुनील बागुल शिवसेना उपनेते व श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष, पंढरीनाथ थोरे, अध्यक्ष, के.व्ही.एन.नाईक शिक्षण संस्था उपस्थित होते
काय काय असणार प्रदर्शनात?
या वर्षी महोत्सवात खास आकर्षण आहे दुग्धव्यवसाय व स्वयंरोजगार अंतर्गत रोजगाराची संधी. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव नोंदणी करून मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग या संदर्भात मार्गदर्शन, शेतकरी बांधवांसाठी सेवामार्गाच्या सात्विक कृषिधन निर्मिती अंतर्गत सात्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान, स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन तसेच दुर्ग संवर्धन अभियान अंतर्गत ५०० हून अधिक प्राचीन शस्त्र – अस्त्र प्रदर्शनसह मोडी लिपी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके व शेतकरी वधू- वर परिचय मेळाव्याचे हि आयोजन करण्यात आले आहे.
या विषयांवर मिळणार मार्गदर्शन
जनावरांचा चारा, पर्यावरण, शेतकऱ्यांची उपजीविका या दृष्टीने सुद्धा अणण्यसाधारण महत्व आहे. याबाबतीत लागवड ते बाजारपेठ असे सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. यासह भारतीय शेती, दुर्मिळ वनोषधी, अत्याधुनिक शेती ज्ञान, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार, शेतकरी वधुवर परिचय, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, आरोग्य व व्यसनमुक्ती, गावरान बी बियाणं, प्राचीन भारतीय कृषी विज्ञान, बारा बलुतेदार गाव, कृषी प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी व खाद्य संस्कृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन करणारे विभाग येथे असतील.
संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीमाऊली सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणाही आयोजकांनी केली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
२४ जानेवारी रोजी कृषी दिंडीने महोत्सव सुरु होईल.
रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान अशी निघणारी कृषी दिंडी हे या कार्यक्रमात खास आकर्षण असते. कृषी दिंडी कार्यक्रम स्थळी पोचताच दुपारी ०२ ते ४ वाजे दरम्यान उदघाटन सोहळा संपन्न होईल. प पू गुरुमाऊली यांचे सह सामाजिक राजकीय शासकीय मान्यवर, यांचेसह राज्यातील प्रमुख नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. सायं. ५ ते ६ दरम्यान कृषी उद्योजकता युवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित केला आहे याच दिवशी कृषी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
२५जानेवारी रोजी सकाळी. विषमुक्त शेती आणि दुपारी पशुगोवंश दुग्धव्यवसाय चर्चा,
सायं. ५ ते ६ – कृषी या विषयावर राजकीय मान्यवर यांचे समवेत युवा विचारमंथन कार्यक्रम होईल
२६ जानेवारी रोजी सकाळी.पर्यावरण व दुर्ग संवर्धन व दुपारी स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा,
सायं. ५ ते ६ – कृषी या विषयावर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल.
२७ जानेवारी रोजी शेतकरी वधू-वर परिचय मेळावा,
सायं. ५ ते ६ – कृषी या विषयावर अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल.
२८जानेवारी रोजी सकाळी. माहिती तंत्रज्ञान जनजागृती –सायबर सुरक्षा तसेच दुपारी- सरपंच, ग्रामसेवक मांदियाळीने महोत्सवाची सांगता होईल. सायं. ५ ते ६ – कृषी या विषयावर सिने क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर यांचे समवेत युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल.
या पाच दिवसीय कार्यक्रमात प्रवेश मोफत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आबासाहेब मोरे यांनी केले आहे.