खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर फौजदारी दाखल करत तीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक
जिल्ह्यातील नऊ तालुक्यामध्ये प्रत्येकी एक भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे.
जिल्हास्तरावर स्वतंत्र पथक
तालुकास्तरावर भरारी पथकास जिल्हास्तरावरही स्वतंत्र भरारी पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी लक्ष ठेवले जाणार आहे.
जिल्हास्तरीय पथकात कोण असणार?
जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी असून या पथकात मोहीम अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, वजन मापन अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
तर परवानाही होणार निलंबित
● खरीप हंगामात बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
● बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तालुकास्तरावरील तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधून तक्रार करावी. - अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग
अधिक वाचा: Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी