Join us

सोयाबीन कमी भावात विकताय? शेतमाल तारण कर्ज घ्या, नंतर विका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 6:00 PM

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय

बाजारात सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने यंदा सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत ते विकण्यापेक्षा शेतमाल तारण कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांची पैशांची गरज पूर्ण होऊ शकते आणि नंतर भाव चांगला आल्यानंतर सोयाबीन विकता येते. त्यामुळे सोयाबीन कमी भावात का विकायचे; शेतमाल तारण कर्ज घेऊ का, अशी मानसिकता शेतकऱ्यांची बनत आहे.

राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने १९९०-९१ पासून शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. उत्पादित केलेला शेतमाल काढणी हंगामात शेतकरी आर्थिक निकडीमुळे त्वरित बाजारात आणतात. परंतु, एकाच वेळी मोठी आवक होते. परिणामी बाजारभाव घसरतात व शेतकऱ्यांचे नुकसान होते. २०२३-२४ साठी केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये जाहीर केला आहे. परंतु, बाजारात सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव मिळत असल्याची स्थिती आहे. शेतमालाला सध्या कमी भाव आहे आणि काही महिन्यांनी दरवाढीची शक्यता वाटत असेल तर तोपर्यंत शेतकरी स्वतः आपला शेतमाल बाजार समितीमध्ये तारण ठेवू शकतो. त्या आधारे मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेवर तो व्यवहार करू शकतो. अपेक्षेनुसार दरवाढ झाली तर शेतकरी शेतमाल विक्री करून कर्जाची परतफेड करू शकतो.

काय आहे शेतमाल तारण कर्ज?

शेतकऱ्यांना असणारी आर्थिक निकड पूर्ण होऊन त्यांच्या शेतमालासाठी रास्त भाव मिळावा या दृष्टिकोनातून राज्य पणन मंडळामार्फत बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. बाजार समितीच्या गोदामात अथवा वरबार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालावर तारण कर्ज दिले जाते.

व्याज किती?

शेतकऱ्याने शेतमाल जमा केलेल्या गोदाम पावतीवर चालू बाजार भावानुसार ७५ टक्के रक्कम शेतकऱ्याला १८० दिवसांसाठी दसादशे ६ टक्के व्याजाने बाजार समिती तारण कर्ज देते.

लाभ कसा घेणार?

शेतकयांनी त्यांचे आधार कार्ड, पीकपेरा ₹ प्रमाणपत्र, शेतमाल जमा केल्याची पावती तसेच योग्य कागदपत्रे सादर करून शेतमाल तारण कर्जासाठी मागणी करता येते. अधिक माहितीसाठी बीड बाजार समितीमध्ये अस्थापना प्रमुख शेख कलिम यांच्याशी संपर्क साधावा.

एकाही शेतकऱ्याने घेतला नाही लाभ

गतवर्षी सोयाबीनला हमीपेक्षा जादा भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल रास्त दरात विकता आला. आर्थिक गरज भागल्याने एकाही शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला नाही.

शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांना योग्य व चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे नुकसान टळते. पणन मंडळाच्या निर्देशानुसार येथील बाजार समितीमध्ये योजना राबवत आहोत. गरजू शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- श्यामराव पडुळे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेती