बदनापूर : सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बॅंक अर्थ सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर आणि कृषी विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.०४) मोसंबी उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम कृषी पद्धतींवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जालना कृषी विभागाचे उप विभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवारअध्यक्षस्थानी होते. तसेच तालुका कृषी अधिकारी बदनापूर जी. एम. गुजर, विभागीय प्रकल्प सहाय्यक मॅग्नेट केशव चव्हाण, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर डॉ. एस. डी. सोमवंशी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी भुषण पुरस्कार सन्मानित नाना बारगजे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे हेमंत जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर डॉ. दिपक कच्छवे यांनी मोसंबी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच डॉ. एस. व्ही. भावर, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या) केव्हिके, छत्रपती संभाजीनगर यांनी मोसंबी पिकातील बहार व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिले.
डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी मोसंबी पिकातील रोग व कीड व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले आणि मोसंबी पिकातील मार्केटिंग आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान बाबत उद्धव बारबैले, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.जी. शेतकरी उत्पादक कंपनी, आंतरवाला जि. जालना यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांचे शंका आणि प्रश्नांची सोडवणूक केली. मॅग्नेट प्रकल्पाचे राहुल शेळके, मारोती पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मॅग्नेट प्रकल्पाची रुपरेषा, कार्यप्रणाली आणि आर्थिक सहाय्य करताना शासनाच्या अनुदान याबाबतच्या तरतुदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्रशांत पवार सर यांनी मोसंबी लागवड, खत व्यवस्थापन, कीटकनाशके आणि रोगांचे नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील नवीन संधी या विषयांवर विशेष भर दिला. तसेच, कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात उपस्थित तज्ञांनी शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादनात येणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत जालना जिल्ह्य़ातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे शेतकरी मोसंबी उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांनी तर आभार प्रदर्शन मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी केले.