राजरत्न सिरसाटअकोला : शेतीला व्यावसायिकतेची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक प्रकल्प निर्माण केला असून, याच माध्यमातून प्रथमच शेणातून तयार करण्यात आलेले (व्हर्मीकंपोस्ट) गांडूळखत आखाती देशांत निर्यात करण्यात आले आहे. देशपातळीवरील हा अभिनव उपक्रम मानला जात आहे.
विदर्भातील पशुधनाचा विचार करता अत्यल्प दूध उत्पादकतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन फायदेशीर ठरत नसताना उपलब्ध शेण व गोठ्यातील वाया जाणारे मलमूत्र तथा चाऱ्याचे अवशेष, इत्यादींच्या प्रभावी वापरातून गांडूळखत तथा वर्मीवॉशची निर्मिती आर्थिक लाभ देणारी ठरत असून, गुणवत्तापूर्ण गांडूळखत निर्यातीसाठी आता विद्यापीठाच्या सहयोगातून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे.
देशी गायींवर करणार भृणप्रत्यारोपणकृषी विद्यापीठात देशी गायींची संख्या वाढविण्यात येणार आहे. म्हणूनच सायवाल गाईची निवड करून यासाठीचे भृणप्रत्यारोपण करण्यात येत आहे. कृत्रिम रेतन करून कालवडींचा जन्म झाला आहे. ही गाय प्रतिदिन १५ ते १६ लिटर दूध देत आहे, गीर, लालकंधार, डांगी व गौळाऊ, आदी गार्डचे येथे संगोपन करण्यात आले आहे.
शेणापासून मिळणार पैसाएका गाईच्या शेणापासून अडीच टन गांडूळखत आणि व्हर्मीवॉशही मिळतो. १० रुपये किलो याप्रमाणे वर्षाला एका गाईपासून २५ हजार आणि गोमूत्रापासून मिळणाऱ्या व्हर्मीवॉशचे पाच हजार रुपये असे ३० हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय उरलेल्या शेणाचीही विक्री करता येईल.
कंटेनरला हिरवी झेंडीमंगळवारी गांडूळखताच्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, कृषी पदवीधर निर्यातदार प्रवीण वानखडे, चांगदेवराव वानखडे, चंदाबाई वानखडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. ययाती तायडे, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. आदिनाथ पसलावार यांच्यासह डॉ. जयंत देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती; तर परिसरातील शेतकरी, प्रक्षेत्रावरील अधिकारी, कर्मचारी, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्राध्यापक वृंद, उद्योजकता विकास मंचचे सदस्य विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
खताचा एक कंटेनर दुबईला रवानाकृषी विद्यापीठाने शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत व वर्मिवाशचा २८ टनांचा एक कंटेनर मंगळवारी दुबईला पाठविला आहे. येत्या दोन दिवसांत दुसरा कंटेनर पाठविण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठात सध्या दररोज दोन टन उत्पादनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
कृषी विद्यापीठ, शेतकरी, उद्योजकता विकास फोरमचे सदस्य, कृषी पदवीधर या माध्यमातून गांडूळखत परदेशात पाठवण्यात येत असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य आहे. - डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
अधिक वाचा: Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव