खामगाव जिल्ह्यात परंपरागत पिके बाजूला सारत अनेक शेतकरी आता नवनवीन पर्यायांचा अवलंब करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्यातील ५२३ शेतकऱ्यांनी ६२७ एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. तुती लागवड करून रेशीम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी या परंपरागत पिकांचे घसरलेले भाव, नैसर्गिक संकटे यांमुळे दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत.
मनरेगा अंतर्गत ३३५ एकर आणि उर्वरित २९० क्षेत्रावर ''सिल्क समग्र २'' या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी नोंदणी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत २०० एकर क्षेत्रावर तुती लागवड पूर्ण झाली आहे.
शासनाकडून रेशीम शेतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. सिंचनाचीसुविधा असलेले शेतकरी विविध प्रयोग करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पारंपरिक पिकासोबतच तुती लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेला रेशीम उत्पादन हा कृषी आधारीत उद्योग आहे.
पूर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करून लागवड करण्यात येत होती, त्यामध्ये २० ते २५ टक्के तूट, खाडे पडत असल्यामुळे एकरी ५ हजार ५०० झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रती एकर २०० अंडिपुंजाचे संगोपन होत नव्हते. आता तुतीच्या तीन महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपांपासून लागवड केली जाते. मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी रोपे खरेदी व मजुरीचा खर्च देखील दिला जात असल्याने तुती लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
राज्यातील २४ जिल्ह्यांत तुती लागवडीवर भर
तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत बुलढाणासह राज्यातील २४ जिल्ह्यांत तुती लागवडीवर भर दिला जात आहे. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुती लागवड केली जाते. राज्यात सन २०२१-२२ मध्ये तुती लागवडीखाली असलेले १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र सन २०२३ - २४ मध्ये १८ हजार ६०७ हेक्टरवर पोहोचले आहे. यात सुमारे ३ हजार ७०२ हेक्टरने वाढ झाली आहे.