(Sericulture Award)
रेशीम शेतीमध्ये कोष उत्पादनात भरघोस उत्पन्न मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्याबद्दल बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील प्रगतिशील शेतकरी सर्जेराव चव्हाण यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा रेशीमरत्न पुरस्कार जाहीर झाला.
लवकरच या पुरस्कारचे वितरण होणार आहे. सर्जेराव चव्हाण हे सुरुवातीच्या काळात कुस्तीमध्ये होते. त्यांनी ५५ किलो वजनगटामध्ये सलग पाच वर्षे जिल्हा चॅम्पियन पहिलवान म्हणून आपली छबी उमटवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहकपदी सेवा बजावली.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला. शेतीचा छंद तसा त्यांना सुरुवातीपासूनच होता; पण वेळेअभावी लक्ष देता येत नव्हते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेताकडे लक्ष दिले. सुरुवातीला सर्जेराव चव्हाण कुटुंबीय शेतीमध्ये तूर, कापूस, सोयाबीन अशी नगदी पिके घेत होते.
कापसाला बोंड आळी आल्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असायची, उत्पादन कमी येत असल्याने कुटुंबाच्या गरजा भागात नव्हत्या. त्यानंतर त्यांनी शेतात भाजीपाला, कांदा, वांगी, इत्यादी पिके घेण्याकडे कल होता; पण निसर्गाचा लहरीपणा व शाश्वत भाव मिळत नसल्याकारणाने अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते.बालाघाट परिसरामध्ये कमी पर्जन्य व पाण्याच्या कमतरतेमुळे बागायती शेती करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. सन २०१७-१८ मध्ये दोन एकर तुतीची लागवड केली.
पहिल्याच वर्षी इतर पिकांपेक्षा वार्षिक उत्पन्न चांगले मिळाले, त्यामुळे रेशीम शेती करण्याकडे त्यांचा उत्साह वाढला. तसेच कुटुंबाची आर्थिक भरभराटही झाली, असे सर्जेराव चव्हाण यांनी सांगितले.
चांगले पर्जन्यमान झाले तर दोन एकरांमध्ये कमीत कमी ४ ते ६ लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित मिळते. बीड जिल्हा रेशीम अधिकारी वराड व कुटे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कुटुंबीयाची साथ आणि शासनाच्या जिल्हा रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शनातून त्यांनी शेतीमध्ये आर्थिक सुबत्ता प्राप्त केली. रेशीम शेतीमध्ये कोष उत्पादनात भरघोस असे उत्पन्न मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा 'रेशीमरत्न' पुरस्कार १० सप्टेंबर रोजी जाहीर झाला.
प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी पत्र पाठवून निवड केल्याचे कळविले. पुरस्कार मिळाल्याबद्दल चव्हाण यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
प्रत्येक शेतकऱ्याने १ एकर रेशीम शेती करावी
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून, त्याची 'ऊसतोड कामगारांच्या जिल्हा' म्हणून ओळख आहे, हे मागासलेपण पुसण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने १ एकर रेशीम शेती जरी केली तरी त्याचा आर्थिक विकास होईल. परिणामी बीडची ओळख ही रेशीम बागायतदारांचा जिल्हा अशी होईल. - सर्जेराव चव्हाण, पुरस्कारप्राप्त शेतकरी