रेशीमच्या (Reshim) क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना ४.१९ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत रेशीम लागवड (Cultivation) करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात वर्षभरापासून तुतीच्या लागवडीपासूनचे १.०२ कोटी रुपयांचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे रेशीम शेतकऱ्यांसाठी आता काटेरी झालेले आहे.
शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी 'एमआरईजीएस' ('MREGS') रेशीमचे उत्पादन घेण्यासाठी तुतीची लागवड केली जाते. जिल्ह्यात आतापर्यंत ३७१ शेतकऱ्यांनी ३७४ एकरामध्ये तुतीची लागवड केली, कीटक संगोपनगृह बांधले.
मात्र, त्यांना अनुदान (subsidy) उपलब्ध झालेले नाही. त्यानंतर, मागीलवर्षी व यंदा महारेशीम अभियान राबविण्यात आले. या दरम्यान ही शासनाला अनुदान देण्याचा विसर पडला असल्याचा आरोप या जॉबधारक शेतकऱ्यांनी केला आहे.
या योजनेमध्ये तुती लागवड आणि जोपासण्यासाठी कुशल कामाला ३२ हजार व अकुशल कामाला २ लाख ०२ हजार ५५४ असे २,३४,५५४ रुपये, तर कीटक संगोपनगृह बांधकामाला १,८१,२६१ रुपये असे एकूण ४,१८,८१५ रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते.
याबाबतचे प्रस्ताव जिल्हा रेशीम कार्यालय, संबंधित तालुका कृषी अधिकारी व सामाजिक वनीकरण विभागाद्वारे सादर करण्यात आलेले आहे. मात्र, शासनाकडून अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही.
वैयक्तिक कुशल कामांचा प्रलंबित (तालुकानिहाय निधी)
अमरावती तालुक्यात १४,१०,३८४, अचलपूर - ३८,१०,८६९, भातकुली-१,१९,८०४, चांदूरबाजार- २४,२८,५३१, चिखलदरा- १,५९,३९८, धारणी- ३,४७५, धामणगाव - ४९,०५०, मोर्शी-६,४८,३७८, तिवसा- १०,३६,४८४ व वरुड तालुक्यात ५,७८,६८० रुपयांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याने अडचणीत आले आहे.
कसे देणार प्रोत्साहन ? शेतकऱ्यांचा सवाल
* महारेशीम अभियानात शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, निधी नसल्याने कसे प्रोत्साहन देणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
महारेशीम अभियानातही पडला विसर
* ३७४ एकरात तुतीची लागवड करण्यात आली. परंतु बहुतेक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळाले नाही.
* मग्रारोहयोमधील लागवड करण्यात आलेल्या १.०२ कोटींचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.
वैयक्तिक कुशल कामाच्या प्रलंबित निधीबाबत पाठपुरावा सुरू आहे. शासन अनुदान प्राप्त होताच, संबंधितांना याचा लाभ दिल्या जाईल. - ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (रोहयो).