सागर कुटे
खामगाव (जि. बुलढाणा) : रेशीम शेती (Sericulture Farming) उद्योगामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आणि अधिक उत्पादन मिळवता येते. मात्र, मनरेगा व सिल्क (Silk) समग्र २ या योजनांतील अनुदान यावर्षी शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही.
परिणामी, यावर्षी महारेशीम अभियानात (Mahareshim Abhiyan) शेतकऱ्यांची नोंदणीची टक्केवारी घसरली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारचा हिस्सा प्राप्त न झाल्याने हे अनुदान रखडल्याचे सांगितले जात आहे.
या कारणामुळे यंदा फक्त ७३ टक्के शेतकऱ्यांची (Farmer) नोंदणी झाली आहे, तर गेल्यावर्षी २१६ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. महारेशीम अभियानांतर्गत तुती लागवडीसाठी राज्यात शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.
नोंदणीसाठी ९ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. मात्र, यावर्षी या नोंदणीचा टक्का घसरला आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, तसेच सिल्क समग्र २ या योजनेत अनुसूचित जाती व जमातींना मिळणारा लाभ प्रलंबित राहिल्याने याचा परिणाम 'महारेशीम अभियाना'तील नोंदणीवर झाला आहे.
५,९२७ हेक्टर क्षेत्राची नोंद
राज्यात ५ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी नोंदणी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात २ हजार ९३२ एकर क्षेत्राची नोंदणी झाली, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात जिल्हा रेशीम कार्यालयाच्या सहकार्याने कृषी विभागाने १५० एकर नोंदणी केली.
मनरेगाअंतर्गत कुशल आणि अकुशल दोन्ही बाबींचे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे, तसेच सिल्क समग्र दोन या अंतर्गत मिळणारा लाभसुद्धा अनुसूचित जाती-जमातीचा प्रलंबित आहे. यावर्षी राज्यात ७३ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. - डॉ. महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम.
विभागानिहाय शेतकरी नोंदणी
९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ अखेर
नागपूर | १०२५ | ४२३ |
छ. संभाजीनगर | ३३५० | २८९७ |
पुणे | २४१० | १३५४ |
अमरावती | १२५० | ९३७ |
रेशीम शेतीला प्रोत्साहन गरजेचे!
राज्य व केंद्र सरकारने रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत; परंतु या योजनांचा प्रभावी अंमल करण्यासाठी योग्य नोंदणी आणि वेळेवर अनुदान वितरण आवश्यक आहे. रेशीम शेतीत यशस्वी बनवण्यासाठी विविध पायाभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; IMD ने दिला अलर्ट