Sericulture Farming : मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनासह पशुधन, शेतीपूरक व्यवसायावरही होताना दिसून येत आहे. वाढत्या थंडीचा रेशीमSericulture शेतीवर अधिक परिणाम दिसून येत आहे. रेशीम अळी अन्नच खात नसल्याने पूर्णा तालुक्यातील चुडावा शिवारातील रेशम उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी आजही पारंपरिक पिके घेण्यावर भर देतात. मात्र, पावसाची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, वेळेत उपलब्ध होऊ न शकणारा मजूरवर्ग, बेभरवशाची बाजारपेठ आणि कच्च्या मालाची अनिश्चितता या सर्व बाबींमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो, तेवढेही उत्पन्नही मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे पूर्णा तालुक्यातील चुडावा शिवारात अनेक शेतकरी हे शेतीपूरक उद्योगांवर भर देत असून अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीवर भर दिला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली. त्याचा परिणाम शेतीवर जाणवू लागला आहे. अळ्या तयार करण्यासाठी आणलेल्या अळ्या चारा खात नसल्याचे शेतकऱ्यांपुढे संकट ओढवल्याने चिंतेत आहेत.
संगोपन हवे २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान
• रेशीम अळीचे संगोपन हे मुख्यत्वे २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व ६० ते ८५ टक्के आर्द्रता या वातावरणामध्ये केले जाते. रेशीम अळी लहान असताना तुती झाडाची कोवळी पाने बारीक चिरून खाऊ घातली जातात.
• अळी मोठी झाल्यावर तुती झाडांच्या फांद्या कापून आणून अळ्यांना खाऊ घातल्या जातात. २५ ते २६ दिवस तुती पाला खाल्यानंतर अळी स्वतः भोवती रेशीम कोष तयार करते. मात्र, तापमान घटीमुळे रेशीम अळी पालाच खात नसल्याने चिंता वाढली.
शेगडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर
* रेशीम आळ्यांचे संगोपन करताना तेथील तापमान योग्य राहण्यासाठी शेगडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करावा.
* २० अंश सेल्सिअस तापमानपेक्षा कमी राहू नये, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. रेशीम अळीसाठी शेडमध्ये शेगडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे सोयीस्कर ठरते.
* मात्र, तरीही थंडीचा जोर कायम राहिल्यावर रेशीम उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
चुडाव्यात ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या
• पूर्णा तालुक्यात अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहेत. चुडावा गावात संख्या मोठी असून ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीवर भर दिला आहे.
• मात्र, सध्या वातावरण बदलाचा रेशीम शेतीवर परिणाम होत आहे.
'या' करा उपाय योजना
* शेडनेट रेशीम किटक संगोपनगृहात स्वच्छता कळीचा मुद्दा आहे. * कच्ची जमीन, वाळू, मुरूम असेल तर १०० टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. जमिनीवर कोबा (सिमेंट, काँक्रेट) किंवा फरशी करून घेणे. * शेडनेटच्या आतील बाजूला अर्ध्या फुट खोलीची व एक फुट रूंदीची नाली करून घ्यावी.
* २% फॉरमॅलीन हात धुण्यासाठी, नायलॉन नेट, कॉटन जाळी, पॉलीथीन अच्छादन यांना निर्जंतूकीकरण साठी वापरावे.* लोखंडी रॅक असतील तर फॉरमॅलीन फवारू नये रॅकला गंज चढतो तशी शिफारस नाही. जिवाणू, विषाणू व बुरशींच्या प्रादुर्भावामुळे रोग बळावतो त्यामुळे ब्लिचिंग पावडर २ टक्के व ०.३ टक्के चुना द्रावणाने कोष काढणी नंतर शेडनेट गृहात फवारणी करावी.
दोन एकर तुती लागवड केली आहे. उन्हाळा व हिवाळ्यामध्ये या उद्योगांमध्ये लक्ष द्यावे लागते. मागील काही दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने रेशीम अळीची वाढीची अवस्था मंदावली आहे.- ज्ञानेश्वर देसाई, शेतकरी
आमच्याकडे दीड एकर तुती लागवड केली आहे. आता क्रॉप सुरू झाले आहे. २०० अंडी आणली आहेत. मात्र, थंडीमुळे अळी चारा खात नाही. त्यामुळे अळीची व्यवस्थित वाढ होत नाही. असेच तापमान घटत राहिल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. - बबनराव देसाई, शेतकरी