Lokmat Agro >शेतशिवार > Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा

Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा

Sericulture farming : The concept of "silk and milk" benefits the farmers; Double benefit from silk industry | Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा

Sericulture farming : "सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फायद्याची; रेशीम उद्योगातून दुहेरी फायदा

"सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना जर शेतकऱ्यांनी अवलंबली तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो. (Sericulture farming)

"सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना जर शेतकऱ्यांनी अवलंबली तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो. (Sericulture farming)

शेअर :

Join us
Join usNext

Sericulture farming :  भारतात ७० ते ८० वर्षापासून रेशीम उद्योग केला जात आहे. स्वतः च्याच शेतात मेहनत करून उद्योग उभारणीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळणारा रेशीम उद्योग हा अत्यंत चांगला उद्योग असून शेतकरी बांधवांनी याकडे वळण्याची गरज आहे.

यातून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवू शकतात. रेशीम शेती सोबतच पशुधन असणे देखील गरजेचे आहे. याचा फायदा सेंद्रिय निविष्ठांचा रेशीम शेती करण्यासाठी होतो. तसेच दुग्ध उत्पादनात वाढ करण्यास तुती फायदेशीर ठरू शकते.

"सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना जर शेतकऱ्यांनी अवलंबली तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या रेशीम संशोधन योजना चे प्रमुख मा. डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या दत्तक गाव देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांच्या तुती रेशीम शेतीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रेशीम संशोधन योजना चे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे आणि कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर यांनी शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी भेट दिली.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना तुती रेशीम उद्योग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, विषय विषयज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ. संजुला भावर, प्रा. गीता यादव तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे २०२२-२३ साठीचा 'रेशीमरत्न' पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी शहादेव ढाकणे व सदाशिव गीते यांच्यासोबतच प्रगतशील शेतकरी दीपक जोशी, गावचे सरपंच योगेश कोठुळे, जनार्धन गीते व गावातील रेशीम उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी डॉ. लटपटे यांनी सांगितले की, शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीतून आर्थिक नफा मिळू शकतात. यात अनेक अडचणी देखील येतात. परंतु अभ्यासु वृत्तीने आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या अडचणीवर मात करता येते. रेशीम शेतीत २०१८ पासून उझी माशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

परंतु या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पुर्णपणे नियंत्रण मिळवता येते. तसेच उझी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी निसोलायनक्स थायमस (Nesolynx Thymus) या उझी माशीवरील परोपजीवी किटकांचा वापर केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते. हे परोपजीवी किटक रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याचा रेशीम उत्पादकांनी
नक्की वापर करावा.

बऱ्याच भागात रेशीम कोष तयार न होणे (नॉन स्पिनिंग) ची समस्या आढळून आली आहे. याला मुख्य जबाबदार घटक म्हणजे आसपासच्या परिसरात रासायनिक घटकांचा जसे की कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक व खते यांचा जास्तीचा वापर हा आहे. आसपासच्या परिसरात या रासायनिक घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला असल्यास त्याचा विपरीत परिणाम रेशीम उत्पादनात होतो.

यासाठी शेतकरी बांधवांनी शिफारस नसलेल्या खते, कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके यांचा वापर करू नये. यासाठी २० टन शेणखत प्रति हेक्टरी प्रतिवर्ष तसेच ०८ टन गांडूळ खत प्रति हेक्टरी प्रतिवर्ष याची शिफारस असून याचा वापर रेशीम शेतीमध्ये करावा. याचा वापर करत असताना एक वर्ष शेणखत तर एक वर्ष गांडूळ खत याप्रमाणे आलटून पालटून ही खते जमिनीत द्यावीत.

जुन व सप्टेंबर मध्ये दोन समान हफ्त्यात या निविष्ठाचा वापर जमिनीत करावा. तसेच प्रत्येकाने गांडूळ खताचा प्रकल्प आपल्या शेतावर करावा. रेशीम शेतीसाठी योग्य लागवड पद्धत व योग्य लागवड अंतराचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

लागवडीसाठी पट्टा पद्धत फायदेशीर आढळून आलेले आहे. तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात दिवस व रात्रीतील तापमानात खूप मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येते.

याचा विपरीत परिणाम रेशीम शेतीवर होतो. याकरिता शक्यतो सप्टेंबर महिन्यात बॅच घेणे टाळावे या खंडाचा पुढील बॅच चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी फायदा होतो. याचबरोबर सर्व रेशीम उत्पादकांनी माती परीक्षण करून घ्यावे आणि त्यानुसार नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

यासोबतच रेशीम उत्पादकाकडे पशुधन असणे हे गरजेचे आहे. याचा फायदा उत्तम शेणखत तसेच गांडूळखत आणि इतर निविष्ठा तयार करण्यास आणि त्यांचा वापर रेशीम शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यासाठी होऊ शकतो.

याच संकल्पनेवर आधारित असलेली आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली 'सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांना फार फायदेशीर ठरू शकते.

यावेळी डॉ. नेहरकर यांनी कृषी किटकशास्त्र विभाग आणि वनामकृवि, परभणी द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच रेशीम शेतीसाठीची तुती लागवड, अळ्यांना येणारे रोग असो किंवा इतर पीक लागवड व त्यावरील येणारे कीड व रोग असो सर्वच ठिकाणी शेतकरी बांधवांनी एकात्मिक पीक संरक्षण पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन किडीचे प्रभावीपणे नियंत्रणही मिळवता येते, असे मत व्यक्त केले.

यावेळी परिसरातील तुती लागवड आणि रेशीम शेडला भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे शास्त्रज्ञाद्वारे निरासन करण्यात आले. तसेच यावेळी डॉ. लटपटे व डॉ. नेहरकर यांनी लिहलेले तुरी रेशीम उद्योग तंत्रज्ञान या पुस्तकाचे वाटप शेतकरी बांधवांना करण्यात आले.

Web Title: Sericulture farming : The concept of "silk and milk" benefits the farmers; Double benefit from silk industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.