Sericulture Park in Jalna :
जालना :
जिल्ह्यात देवमूर्ती येथे दिशा सिल्क इंडस्ट्रीजकडून राज्यातील पहिले 'ऑटोमॅटिक रिलिंग केंद्र' सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पुढील प्रक्रियेतील रेशीम धाग्यास पीळ देण्याचे युनिटही लवकरच सुरू होणार आहे.
जिल्ह्यात रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीच्या २५ कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेने जिल्ह्यातील रेशीमवरील प्रक्रियेमुळे रोजगार निर्मितीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील एकूण तुती लागवडीपैकी जवळपास ६० टक्के क्षेत्र हे मराठवाडा विभागात आहे. पूर्वी शेतकऱ्यांना रेशीम कोश विक्रीसाठी परराज्यांत जावे लागत होते; परंतु वर्ष २०१८ मध्ये जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने राज्यातील पहिली 'रेशीम कोश बाजारपेठ' जालना येथे सुरू करण्यात आली.
त्यामुळे शेतकऱ्यांना जवळच कोशविक्रीची सुविधा निर्माण झाली. रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्राची मूळ संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कल्पकतेमधून तयार झालेली आहे. तसेच त्यांनी वेळोवेळी मेळाव्यास हजेरी लावत शेतकऱ्यांना तुती लागवडीबाबत प्रवृत्त करून रेशीम शेतीविषयक मार्गदर्शनही केले आहे. या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तयार केल्याचे सांगण्यात आले.
रेशीम शेतीला गती
● जिल्ह्यात रेशीम उद्योगाकरिता आवश्यक वातावरण, अंडीपुंज निर्मिती केंद्र, कोष बाजारपेठ, उत्कृष्ट चॉकी केंद्र, रेशीम धागा करणारे युनिट अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
● मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचे रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र उभारणी करण्याची घोषणा केली आहे.
● या रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्रामुळे जालना जिल्ह्यातील रेशीम शेतीला गती मिळेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केले.
रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये
● रेशीम पार्कमध्ये सर्व प्रकारच्या रेशीमचे मातृवृक्ष लागवड, प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण सभागृह, निवास व्यवस्था असेल
● मॉडेल चॉकी कीटक संगोपन गृह, मॉडेल कीटक संगोपन गृह, रंगकाम व विणकाम प्रशिक्षण.
● सभागृह, हातमाग प्रशिक्षण सभागृह, रेशीम प्रक्रिया संग्रहालय, रेशीम उत्पादने प्रचार व विक्री केंद्र. इत्यादींचा समावेश असेल.
● या प्रकल्पामुळे रेशीम शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिके घेता येणार आहेत.