Join us

Sericulture : पारंपरिक पिकांना वजा करून तुती लागवडीतून मिळते शाश्वत उत्पन्न; कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:01 PM

पारंपरिक शेतीला फाटा देत काही तरी वेगळा उद्योग करणे गरजेचे आहे. हीच बाब कळमनुरी तालुक्यातील शेतकरी आता तुती लागवड करण्याकडे वळताना दिसतात.(Sericulture)

Sericulture :

इलीयास शेख / कळमनुरी :

अलिकडच्या काळात एकापाठोपाठ येणारी नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहे.

त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत काही तरी वेगळा उद्योग करणे गरजेचे आहे. हीच बाब कळमनुरी तालुक्यातील पाळोदी, येहळेगाव (तुकाराम), ढोलक्याची वाडी, रेडगाव येथील शेतकऱ्यांनी ओळखून तुती लागवड केली.

यातून त्यांनी पारंपरिक शेतीला जोड देत आर्थिक उन्नती साधली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षात तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी अनुदान देण्यात आले.

तुती लागवडीतून या शेतकऱ्यांना रोजगार मिळालेला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत व्हावी, त्यांचे उत्पन्न वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा, रेशीम उद्योगाची भरभराट व्हावी इत्यादी हेतूने तुती लागवडीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ४ लाख १८ हजार ८१५ रुपये अनुदान दिले जाते.

या वर्षात तालुक्यातील पाळोदी येथील १२, येहळेगाव (तुकाराम) व ढोलक्याची वाडी येथे प्रत्येकी ७ लाभार्थ्यांना तर रेडगाव येथे १४ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. त्यांना शासन योजनेंतर्गत अनुदानही प्राप्त झाले. शिवाय तुती लागवडीतून उत्पन्नातही भर पडली.

मागील वर्षी दाती, जवळा पांचाळ, दिग्रस बु. येथील ११ लाभार्थ्यांना तुती लागवडीसाठी अनुदान देण्यात आले होते. यावर्षी अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. तालुक्यातील रेशीम पूर्णा, जालना येथे विक्रीसाठी नेण्यात येते. यातून शेतकऱ्यांना तीन ते चार लाखांचे वार्षिक उत्पन्न होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव, सातबारा, होल्डिंग आदी कागदपत्रे दिल्यास तुती लागवडीसाठी अनुदान मंजूर केल्या जाते.

शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळावे...

पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात शेतीला जोडउद्याेग आवश्यक आहे. अन्यथा निव्वळ पारंपरिक शेतीच्या भरोशावर राहणे शक्य नाही. अलिकडच्या काळात नैसर्गिक संकटे, शेतमालाचे पडते भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करणे गरजेचे झाले असून, तुती लागवडीकडे वळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

२०१४ पासून दिले जाते तुती लागवडीसाठी अनुदान...

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तुतीची लागवड करावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता शासनाच्या वतीने सन २०१४ पासून अनुदान देण्यात येते. आत्तापर्यंत कळमनुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. काहींकडे अजूनही तुती लागवडीचा प्रयोग सुरू आहे. त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभही मिळाला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीशेतकरीशेती