येत्या ५ ऑगस्टपासून सर्वत्र उत्साहाचा आणि सणांचा मानला जाणारा श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात विविध सणांबरोबरच या महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी उपवास केले जातात. विशेषतः महिला अधिक संख्येने हे उपवास करतात.
मात्र, या महिन्यात उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी आणलेल्या पदार्थावर किंवा तयार खाद्य पदार्थावर 'बेस्ट बिफोर'ची मुदत पाहिल्यानंतरच ते पदार्थ खरेदी करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे.
व्रतवैकल्यांचा महिना
श्रावण महिन्यातील उपवास तसेच नागपंचमी, मंगळागौर आदी विविध सणही येतात. त्यामुळे श्रावण मासाला व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखले जाते.
प्रथिनयुक्त पदार्थांनी वाढते अॅसिडिटी
शरीराला प्रथिनेयुक्त पदार्थांची आवश्यकता असते. मात्र, प्रथिने गरजेपेक्षा अधिक घेतल्यास अॅसिडिटी वाढते.
भगर खरेदी करताना हे लक्षात ठेवा
■ अस्परजिलस बुरशीचा भगरीवर प्रभाव
■ बुरशीमुळे फ्युमिगाक्लोविन विषद्रव्याची निर्मिती
■ जुलै-ऑगस्टचे तापमान व आर्द्रता बुरशीसाठी अनुकूल
■ भगरीचे सुटे पीठ खरेदी करणे शक्यतो टाळा.
उपवासाला रेडिमेड पदार्थ घेताना 'ही' काळजी घ्या
विनाबिलाने खरेदी नको : कुठलाही खाद्य पदार्थ खरेदी करताना खाद्य विक्रेत्याकडून कुठलाही पदार्थ विना बिल खरेदी करू नये. तसेच त्याचा अन्न परवानाही पाहावा.
पॅकबंदच अन्नपदार्थ खरेदी करा : अन्न पदार्थ खरेदी करताना ते पॅकबंदच असलेले खरेदी करा. हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असतात.
उत्पादन तारीख, बेस्ट बिफोर पाहा : पॅकबंद खाद्य पदार्थ खरेदी करतानाही त्यावर कधी उत्पादित केले ती तारीख तसेच बेस्ट बिफोर पाहणे गरजेचे असते.
भेसळ, फसवणूक झाल्यास तक्रार कोठे कराल?
■ खाद्यपदार्थ विक्रेते काही वेळा नागरिकांची फसवणूक करतात.
■ मुदत टळून गेलेले, शिळे, किंवा निकृष्ट खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारतात.
■ अशी तक्रार नगरपालिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या अन्न प्रशासन विभागाकडे करता येते.
श्रावणात उपवास केले जातात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. परंतु हे खरेदी करताना पॅकबंद खरेदी करावेत. हे पदार्थ घेतानाही त्यावरील पदार्थ उत्पादित केलेली तारीख तसेच 'बेस्ट बिफोर'ची तारीख पाहणे गरजेचे असते. तसेच त्या विक्रेत्याकडून त्याचे बिल घेतल्यास त्याविरोधात अन्न निरीक्षकांकडे तक्रार दाखल करता येते. त्यामुळे विक्रेत्याकडून बिल न विसरता घ्यावे. - दीनानाथ शिंदे, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग, रत्नागिरी.
हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म