अनिल पाटीलमुरगूड : आई-वडील दोघेही मेंढपाळ...कुटुंबाचे अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वणवण भटकत होता.
मात्र, मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला अन् या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी यमगे, कागलसह जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरश: धांदल उडाली.
मेंढ्यामागे दमून भागून थकलेल्या या पोराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक पटकावत आपल्या चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा फडकवला.
बिरदेव सिद्धाप्पा डोणे असे या पोराचे नाव. यमगे (ता. कागल) येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवने गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
दोन खोल्यांचं छोटसं घर असल्याने त्याला अभ्यास करायला जागा नव्हती. त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यातच तो अभ्यास करायचा. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला.
मुरगूड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने बारावी विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर त्याने पुण्याच्या सीओइपी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले.
पुढे दोन वर्षे दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर पुणे येथे याच परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. आतापर्यंत दोन वेळा परीक्षा देऊनही त्यात त्याला यश आले नाही. मात्र, तिसऱ्यावेळी त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश खेचून आणले.
वडील सिद्धापा आणि आईसोबत बिरदेव बेळगाव येथील जवळच्या तळावर मेंढरे घेऊन वास्तव्यास आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्याची बातमी कळताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
पोरानं लय कष्ट केलंपरीक्षेदिवशी माझी तब्येत बिघडली होती, माझ्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती अशा अवस्थेत बिरूने परीक्षा दिली आणि आज निकाल लागला. पोरानं लय कष्ट केलं आहे. आज त्याचं चीज झाल्याची भावना वडील सिद्धाप्पा यांनी बोलून दाखवली.
कागलचा अभिमान बिरदेवबिरदेव आपल्या आई-वडिलासह बुधवारी गावी परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन ग्रामस्थ करत आहेत. कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान बिरदेवने मिळवला आहे. सोशल मीडियावर कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्टचा मंगळवारी पाऊस पडला.
अधिक वाचा: राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती