सुधाकर जाधव
शेतीचा वाढलेला खर्च आणि घटलेले उत्पन्न यामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत असून, काहींनी तर वेगळा पर्यायही निवडलेला आहे.(Shet Jamin)
उत्पन्नाच्या दृष्टीने शेती परवडत नसल्याचे बोलले जात असले, तरी अलिकडे शेती हा गुंतवणुकीच्या दृष्टीने अग्रस्थानी विषय ठरला आहे. कारण गेल्या ४२ वर्षात सर्वसाधारण शेतीचे प्रति एकर भाव तब्बल १५० पटींपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे शेती उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीतून जास्त परतावा देत आहे.(Shet Jamin)
खासगीत शेतीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असले तरी रेडी रेकनर दराने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यात येत आहेत. शेती गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. शहर परिसर व महामार्गालगतची शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, बिल्डर्स, उद्योजक, व्यावसायिक गुंतवणूक करत आहेत.(Shet Jamin)
खऱ्या शेतकऱ्यात नाही शेती घेण्याची आर्थिक क्षमता!
* वाढती लोकसंख्या, तुलनेत शेतीचे क्षेत्र तेवढेच असल्याने तुकडीकरण होत आहे.
* शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक बनले आहेत. त्यातच शेतीचे प्रती एकर भाव लाखमोलाचे झालेले आहेत. त्यामुळे शेती खरेदी करणे हे मूळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.
* आगामी पिढ्यांचा विचार करून शेतकरी शेती विकत नाहीत. त्यातच शेती खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होत असल्याने चढ्या भावाने व्यवहार होत आहेत.
जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर क्षेत्र लागवडीयोग्य
* बुलढाणा जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९,५६,७५५ हेक्टर असून, त्यापैकी ८,०७,७५९ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे.
* जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २५,८६,२५८ आहे. या आकड्यानुसार जिल्ह्यात प्रती व्यक्ती केवळ ०.९१ एकर शेती उपलब्ध आहे. मात्र, गेल्या तेरा वर्षात लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेतली असता, सध्याच्या काळात प्रती व्यक्ती शेती क्षेत्राची उपलब्धता आणखी घटलेली आहे.
* परिणामी, शेती क्षेत्रावर असलेला दबाव वाढत असून, शेतीचे तुकडेही अधिक लहान होत चालले आहेत.
महामार्गालगतच्या शेतीच्या भावात ५०० पटींनी वाढ !
* गेल्या ४२ वर्षात राष्ट्रीय महामार्गालगतच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शेतीच्या भावात तब्बल ५०० पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून येते.
* सन १९८२ मध्ये महामार्गालगतच्या शेतीचे प्रतिएकर दर फक्त १० हजार रुपये होते. मात्र २०२५ मध्ये हेच दर वाढून ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
* विशेषतः पेट्रोल पंपाजवळील किंवा उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त अशा ठिकाणच्या शेतीस हे भाव मिळत आहेत.सद्यःस्थितीत महामार्ग व प्रमुख रस्त्यांलगतची शेती वगळता, इतर शेतीचे प्रतिएकर भाव सुमारे १५ लाख रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या ४२ वर्षांत असे वाढले शेतीचे प्रतिएकर भाव
सन | दर |
१९८२ | १०,००० |
१९८७ | २०,००० |
१९९२ | ३५,००० |
१९९७ | ६०,००० |
२००० | ८०,००० |
२००५ | १.२०लाख |
२०१० | ५ ते ७ लाख |
२०१५ | २० लाख |
२०२० | ३० लाख |
२०२५ | ५० लाख |
हे ही वाचा सविस्तर :कोरड्याठाक मराठवाड्यात यशस्वी प्रयोग; कोकण अन् कश्मीरला टाकले मागे वाचा सविस्तर