Join us

धक्कादायक! मागच्या १० वर्षांत ज्वारीचे क्षेत्र ५८ टक्क्यांनी तर उत्पादन ५० टक्क्यांनी घटले

By दत्ता लवांडे | Published: March 09, 2024 8:00 PM

ज्वारी ही सर्वांत जास्त पोषणमूल्य असणारे आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील लोकांच्या अन्नातील महत्त्वाचे पीक असूनही ही परिस्थिती भीषण आणि धोकादायक आहे.

पुणे : मागच्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा भुसार पीके लागवडीकडील कल कमी झाला असून नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे. दहा वर्षांच्या तुलनेत राज्यभरातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमालीचे खाली आले असून उत्पादकताही जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. ज्वारी ही सर्वांत जास्त पोषणमूल्य असणारे आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील लोकांच्या अन्नातील महत्त्वाचा घटक असूनही ही परिस्थिती भीषण आणि धोकादायक आहे.

दरम्यान, २०१२-१३ साली दरम्यान ज्वारीखालील लागवड क्षेत्र हे ३२ लाख हेक्टर होते. तर २१ लाख टनाचे उत्पादन राज्यभरात झाले होते. त्यावेळी प्रतिहेक्टर ६४१ किलो म्हणजे जवळपास साडेसहा क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते होते. ही उत्पादकत आणि लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत मागच्या वर्षी ५० टक्क्यांपर्यंत आले आहे. २०१७-१८ सालापर्यंत ज्वारीचे लागवडीखालील क्षेत्र हे ३२ ते ३५ लाख हेक्टरच्या आसपास होते पण २०१८-१९ साली ज्वारीचे क्षेत्र थेट २४ लाख हेक्टरवर आले. त्यासाली ज्वारीचे उत्पादन हे केवळ ११.९८ लाख टनाचे झाले होते. 

मागच्या पाच वर्षांत ज्वारीचे उत्पादन आणि लागवडीखालील क्षेत्र कमालीचे खाली आले असून मागच्या वर्षी हे क्षेत्र १५ लाख हेक्टर एवढे होते. तर उत्पादन हे १५ लाख टनांचे होते. मागच्या दहा वर्षांची  तुलना केली तर ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात तब्बल ५८ टक्के तर उत्पादनात ४७ ते ५० टक्क्यांनी घट झाली असून ही घट चिंताजनक आहे.

ज्वारीचे उत्पादन आणि क्षेत्र का घटले?शेतकरी आधुनिक शेतीकडे वळल्यामुळे शेती करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सुरुवातीला ट्रॅक्टर आला आणि तेव्हाच शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी असलेला बैल दिसेनासा झाला. ज्यांच्याकडे ४ बैल होते त्यांच्याकडे आज एकही बैल नाही. बैलांना लागणारे खाद्य म्हणजे कडबा हेही दिसत नाही. यामुळेच ज्वारीचा पेरा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी झाल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्वारीच्या दरात वाढ झालेली नाही. पण उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढला आहे यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मागच्या १२ वर्षांमध्ये ज्वारीचे कमी होत गेलेले क्षेत्र आणि उत्पादनाची आकडेवारी

२०१२ - १३ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - ३२.९० लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - २१.०९ लाख टनउत्पादन क्षमता- ६४१ किलो प्रतिहेक्टर

२०१३ - १४ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - ३५.८४ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - २८.४८ लाख टनउत्पादन क्षमता- ७९४ किलो प्रतिहेक्टर

२०१४ - १५ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - ३२.८८ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - २१.०९ लाख टनउत्पादन क्षमता- ६४१ किलो प्रतिहेक्टर

२०१५ - १६ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - ३२.१७ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - १२.०५ लाख टनउत्पादन क्षमता- ३७५ किलो प्रतिहेक्टर

२०१६ - १७ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र -  ३६.१६ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - २५.३८ लाख टनउत्पादन क्षमता- ७०२ किलो प्रतिहेक्टर

२०१७ - १८ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - ३४.६४ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - २३.९० लाख टनउत्पादन क्षमता- ६९० किलो प्रतिहेक्टर

२०१८ - १९ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - २४.३९ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन -  ११.९७ लाख टनउत्पादन क्षमता- ४९० किलो प्रतिहेक्टर

२०१९ - २० साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - २३.७१ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन - १८६४ लाख टनउत्पादन क्षमता- ७८६ किलो प्रतिहेक्टर

२०२० - २१ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र -  २३.२० लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन -  २१.८६ लाख टनउत्पादन क्षमता-  ९४२ किलो प्रतिहेक्टर

२०२१ - २२ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र - २२.८५ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन -  २१.४९ लाख टनउत्पादन क्षमता- ९४० किलो प्रतिहेक्टर

२०२२ - २३ साली असलेली स्थितीज्वारीचे क्षेत्र -  १५.०७ लाख हेक्टरज्वारीचे एकूण उत्पादन -  १५.५१ लाख टनउत्पादन क्षमता-  १०२९ किलो प्रतिहेक्टर

२०२३-२४ ची स्थिती (आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार)ज्वारीचे क्षेत्र -१.११ लाख हेक्टरएकूण उत्पादन - ९० हजार टनउत्पादकता - ५४९ किलो प्रती हेक्टर

ज्वारीला शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना द्यावा लागणारा दर हा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांना परतावा मिळत नाही. तर सध्या पेरणी,  खुरपणी, काढणी, मळणी, मजुर यांचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली असून नगदी पीके घेण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचबरोबर सरकारने जेवढे लक्ष फळपिकांकडे दिले तेवढे लक्ष ज्वारीकडे दिले नाही त्यामुळे अशा सरकारी धोरणाचा फटकाही ज्वारीचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत आहे. - डॉ. सोमिनाथ घोळवे (शेती व पाणीप्रश्नाचे अभ्यासक) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्र