सिद्धेश्वर धरणातील पाणी तीन जिल्ह्यांतील रबी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी वरदान आहे. परंतु यावेळेस तब्बल महिनाभर पाणीपाळीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकांची पेरणी केली, त्यांची पिके सुकू लागली आहेत, परिणामी, रबी हंगामातही काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दरवर्षी सिद्धेश्वर धरणातून रबी हंगामाच्या तोंडावर पाणी सोडण्यात येते. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज-विनंत्याही करण्याची गरज पडत नाही. परंतु यावेळेस रबी हंगाम सुरू झाला असून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत रिकामे करून गहू व हरभरा पिकांची पेरणी कालव्याच्या पाण्यावर केली आहे. परंतु धरण प्रशासनाने पाणीपाळीच्या तारखा २० डिसेंबरपासून पुढे जाहीर केल्या आहेत.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही....
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाणी सोडले जाते. यावर्षी २० डिसेंबर जाहीर केली असून, ती तारीख काहीच कामाची नाही. पेरलेला हरभरा व गहू सुकून जात आहे. -तुकाराम कदम तपोवन, शेतकरी
रबी हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना धरण प्रशासनाने विश्वासात घ्यायला पाहिजे. दरवर्षी धरण प्रशासन विश्वासात घेते. मग यावर्षी पाण्याबाबत का विचारले नाही? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. - विनायक साळुंके, अजरसोंडा, शेतकरी
यलो मोझॅकमुळे यावर्षी सोयाबीन हातचे गेले. रबी हंगामात वेळेवर पाणी मिळाले तर हरभरा व गहू हाताला लागेल. परंतु धरण प्रशासनाने पाणीपाळी तारखा डिसेंबर महिन्यात ढकलल्या आहेत. - उद्धव चव्हाण, आडगाव रंजे, शेतकरी
जवळाबाजार, राजांळा, वडद, नालेगाव, करंजाळा, गुडा, आडगाव (रंजे), टाकळगव्हाण, पोटा, बोरी ( सावंत), अजरसोंडा आदी भागांतील पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी धरण प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना पाणीपाळीच्या तारखा २० डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यात जाहीर कराव्यात, अशी तोंडी मागणी केली आहे. परंतु शेतकऱ्यांची मागणी अजूनही धरण प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तरी गेलेली दिसत नाही. पुढील चार दिवसांमध्ये पाणी सोडले नाही पेरलेले पिके सुकून जातील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.