बुलढाणा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांच्याशी साधलेला संवाद वाचा सविस्तर (Silk and Milk Revolution)
बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यात विविध उपक्रमांचा आढावा घेत हिरवा चारा लागवडीचा कार्यक्रमही घेतला. 'लोकमत ऍग्रो' शी संवाद साधताना त्यांनी 'सिल्क आणि मिल्क क्रांती' ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचा मजबूत आधार ठरू शकते, असे मत व्यक्त केले. (Silk and Milk Revolution)
सिल्क आणि मिल्क उपक्रम शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरेल?
"या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेती व दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यासोबतच विदर्भातही रेशीम शेतीला संधी मिळत आहे. दुग्ध व्यवसाय वाढीसाठी शेतकऱ्यांना मोफत गवताच्या गठ्यांचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे, यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल." (Silk and Milk Revolution)
हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत मिशनचे काय नियोजन आहे?
"गावपातळीवर जिथे पाण्याचे स्रोत उपलब्ध अशा ई-क्लास आहेत, अशा ठिकाणी हिरवा चारा उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. यवतमाळमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील निमकव्हळा येथे देखील हा प्रकल्प सुरू केला आहे. पुढील वर्षभरात ५०० एकरावर हिरवा चारा उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे." (Silk and Milk Revolution)
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
"भाजीपाला नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य दर मिळत नाही. यावर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणारी ड्रायर मशिन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ड्राय केलेला भाजीपाला पोषणमूल्यांसह अधिक काळ टिकतो, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. मेळघाटमध्ये अशा ड्रायर मशीनचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानुषंगाने बाजार समित्यांमध्ये ते उपलब्ध करण्याचे प्रयोजन आहे."
'गाव तेथे गोदाम' योजनेचे महत्त्व आणि सद्यस्थिती काय आहे?
"शेतकऱ्यांना त्यांचा माल गावातच सुरक्षित साठवता यावा आणि योग्य वेळेस विक्री करता यावी, यासाठी राज्यभर गोदामे उभारण्याची योजना आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील समितीमध्ये आपण होतो. ही योजना कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळेल आणि त्यांचे अर्थकारण बळकट होईल. यासंदर्भातील प्रारूप समितीवर आपण होता. काही शिफारशी राज्य शासनाला केल्या आहेत. लवकरच ही योजना आकारास येईल."
चिया प्रकल्पाबाबत आपला दृष्टिकोन काय आहे?
"शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी चिया शेतीला चालना देण्याचा विचार आहे. चिया हे पीक गुरे आणि जंगली प्राणी खात नाहीत, तसेच त्याच्या बियामध्ये पोषणमूल्ये असल्याने मानवी आहारातही त्याचा उपयोग होतो. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल. ज्या भागात वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होते तेथे तो राबविण्याचा मानस आहे."
शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मिशनच्या आगामी योजना कोणत्या आहेत?
"शेतीसाठी पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जलसंधारण प्रकल्प राबवून पाण्याचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न आहे. जलतारा प्रकल्प यासारखे उपाय जलसंधारणासाठी महत्त्वाचे ठरतील, त्यामुळे त्यावर भर देण्याचा आमचा मानस आहे. बांधावरील प्रयोग शाळेचाही शेतकऱ्यांना लाभ होत असून त्याचीही व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे. तसेच जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यासाठी शासनही प्रयत्न करीत आहे व त्यासाठी विविध योजना राबवित आहे. "
हे ही वाचा सविस्तर : Mirchi Lagwad : मल्चिंगवर मिरची लावा; अनुदान मिळवा अन् उन्हाळ्यात पैसा कमवा!