रेशीम उद्योग हा कृषि व वनसंपत्तीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यातील हवामान हे रेशीम शेतीसाठी पोषक आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमित व हमखास उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचे व ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्याचे सामर्थ्य रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक उद्योगामध्ये आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पिकाबरोबर हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेती व त्यावर आधारीत पुरक व्यवसायास चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत रेशीम उत्पादन वाढण्यासाठी आणि बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाने संदर्भाधीन दि.०२ जून, २०२३ अन्वये निर्णय घेतला आहे.
सदर धोरणात प्रत्येक झोनमध्ये एक आदर्श फार्म/रेशीम प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येईल, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि उपकरणे प्रदान करून अस्तित्वातील दहा सरकारी रेशीम शेती केंद्राचे उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रामध्ये (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) रूपांतर करण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील अंडीपुंज निर्मिती केंद्राच्या आवारात महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात येईल असे घोषित करण्यात आले आहे.
रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा वाव विचारात घेता रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी व चालना मिळण्यासाठी रेशीम क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी, शेतकरी व उद्योजक इत्यादी यांना रेशीमबाबत अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षण देणे काळाजी गरज ठरली असल्याने तसेच रेशीम शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्याकरिता महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था तसेच उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) स्थापन व विकसित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील रेशीम शेती व त्यावर आधारीत पूरक उद्योगाचा विकास व्हावा म्हणून रेशीम क्षेत्रातील सर्व घटकांना शास्त्रोक्त पध्दतीने कौशल्यावर आधारित माहिती व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम संचालनालयांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्राचे रुपांतर करून उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) तसेच, महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था स्थापन व विकसित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
अ. महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था
१) महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर.
ब. उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था)
१) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, सासवड, जि.पुणे.
२) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, मांगले, जि. सांगली.
३) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, आंबोली, जि. सिंधुदुर्ग.
४) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, शिर्ला, ता. पातूर जि. अकोला.
५) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, वाई हातोला ता. जि. यवतमाळ.
६) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, खोर ता. चिखली, जि. बुलढाणा.
७) प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, रेशीम पार्क, दाभा, जि. अमरावती.
८) टसर रेशीम प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्र, आरमोरी जि. गडचिरोली.