Sinaghadae Crop :अभय लांजेवार
उमरेड : शिंगाडे म्हटले की, उमरेडच्या शिंगाड्यांची मिठास आणि त्याची चविष्ट चव सर्वश्रुत आहे. मागील अनेक वर्षांपासून विदर्भाच्या बाजारपेठेत सर्वदूर उमरेडचे शिंगाडे पोहोचतात.
यंदा निसर्गचक्राचा जबरदस्त फटका शिंगाडे उत्पादकांना बसला. यंदा अद्याप थंडीचा महिना सुरू झाला नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली असून, उमरेड परिसरातील शेकडो शिंगाडे उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
उमरेड परिसरात तलाव आणि बोडींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गांधीसागर, खारी, भवानी माता, हिरवा, गोपाळन, डबरी, मारुती, पिंगड्यांचा तलाव, गोस्तरा तलाव, कोटगाव, गावसूत, किल्ल्यालगतची लगन बोडी, अकाडबोडी, शिरपूर, उदासा, देशमुख बोडी आदींसह परिसरातील २५ ते ३० च्या आसपास लहान मोठे तलाव व बोड्या या परिसरात आहेत. यामाध्यमातून मासेमारी आणि शिंगाडा उद्योग चालतो. हजारो ढिवर समाजबांधवाची 'भाकर' या अनुषंगाने या उद्योगाकडे बघितले जाते.
उमरेड तालुक्यात शिंगाडा उत्पादनाची मोठी उलाढाल एकेकाळी होत होती. आता निसर्गचक्र, पाणी, शिंगाड्यांच्या बोढ्यांचे रूपांतरण अन्य पिकांसाठी आदी विविध समस्येमुळे शिंगाडे लागवडीत कमालीची घट होते आहे.
साधारणतः दहा तोडे होतात
तलाव वा बोडीत बीजप्रक्रिया, लागवड आदी केल्यानंतर पहिला तोडा साधारणतः तीन महिन्यांत सुरू होतो. जवळपास नऊ ते दहा तोडे शिंगाड्यांचे होत असतात. दिवाळीपर्यंत हा तोडा चालतो. वरपांगी हिरव्याकंच वेलींचे चित्र दिसत असले तरी कीड कधी पोखरून काढेल, हे सांगता येत नाही. निसर्गाने थोडी जरी पाठ दाखविली तर संपूर्ण परिश्रम पाण्यात जात असते, अशा प्रतिक्रिया शिंगाडा उत्पादकांनी व्यक्त केल्या.
मोसम बदललाच नाही
विदर्भ पट्ट्यात साधारणतः नवरात्रीच्या आधीच थंडीची चाहूल लागते. हळुहळु हुडहुडीही सुरू होते. गुलाबी थंडीनेही मोसम बदलत असतो. यंदा नवरात्री आटोपल्यानंतरही वातावरणात फारसा बदल झालेला दिसत नाही. कधी हलकीशी थंड हवेची झुळूक यापलिकडे थंडी अद्याप सुरु झालेली जाणवत नाही. या संपूर्ण वतावरण बदलाचा परिणाम शिंगाडा उत्पादनावर झालेला दिसतो.
साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तलाव अथवा बोडीतच बीज तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर लागवडीच्या कामाला वेग येतो. निंदण, औषधांची फवारणी, अतिशय बारकाईने नियोजन आखले जाते.
चिखलाचा मार्ग तुडवीत तलाव, बोडीत डोंग्यांचा आधार घेत परिश्रम आणि मेहनतीच्या बळावर शिंगाडा उत्पादक या पिकासाठी धडपडतो. कधी दिवसभर अंगाला चटका लावणारी उन्ह सोसावी लागते तर कधी पावसाच्या लपाछपीचा सामनाही करावा लागतो. अगदी पेरणीपासून ते अंतिम तोडा होईस्तोवर पाण्यावर तरंगणाऱ्या या पिकांसाठी शिंगाडे उत्पादकांना अक्षरशः घाम गाळावा लागतो.
उत्पादनात कमालीची घट झाली आहे. ४० ते ५० रुपये किलो असे दर मिळत आहेत. उत्पादनच घटल्याने घामाचे दाम योग्य मिळत नसल्याची खंत बालाजी नागपुरे या शिंगाडा उत्पादकाने व्यक्त केली.
साधारणतः शिंगाड्याच्या एका वेलीला पाच ते सात शिंगाडे लागतात. यंदा थंडीचे वातावरणच नसल्याने केवळ दोन- तीन शिंगांड्याचेच वेल दिसून येत आहेत. थंडीचे वातावरण नसल्यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक पाण्यातच सडत आहे.- गुलाब मोहीनकर, शिंगाडा उत्पादक, उमरेड