'मागेल त्याला शेततळे' ही योजना कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जागृती निर्माण केली जात आहे; पण जमिनी खडकाळ असल्याने ७५ हजार रुपयांत शेततळे होत नाहीत. त्यामुळे साहेब, पाऊण लाखात शेततळे होत नाही, किमान दीड लाख तरी द्या, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
'मागेल त्याला शेततळे' या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गरीब शेतकऱ्याला शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. याद्वारे शेतकरी त्याच्या शेतीलापाणी देऊन चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो. त्यासाठी शासनाने 'मागेल त्याला शेततळे' ही योजना सुरू केली. योजना तशी चांगली; पण ७५ हजार रुपयांत काहीच होईना, त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
तर दुसरीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेऊन ही योजना सफल करावी, यासाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांत जनजागृती केली जात आहे.
ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात आहेत; पण कमी रकमेची तरतूद असल्याने शेतकरी शेततळे करायला तयार नाहीत. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. एका कृषी सहायकाने किमान पाच शेततळे शेतकऱ्यांकडून करून घ्यावे, असे फर्मान आहे. त्यानुसार जागृती निर्माण करण्यात येत आहे. पण पाऊण लाखात शेततळे होत नाही. परिणामी उद्दीष्ट पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.
शेतकऱ्यांनी योजनेकडे फिरवली पाठ
निसर्गाच्या सततच्या प्रकोपाने हवालदिल झालेला शेतकरी शेततळे करायला तयार नाही. शेततळे करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे; पण पाऊण लाख रुपयांवरून किमान दीड लाख रुपयांची वाढ होण्याची आवश्यकता आहे, असे शेतकरी बोलू लागले आहेत.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट