यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर जिल्ह्यातील विविध भागात द्राक्षलागवड केली आहे. मात्र, सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असून, जवळपास ६०० हेक्टरवरील द्राक्षबागांवर करपा, भुरी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी उत्पन्न निघण्याची आशा उत्पादकांना होती. दूषित वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धाराशिव जिल्ह्यात जवळपास ६०० हेक्टरवर फळबागा आहेत. यामध्ये धाराशिव तालुक्यातील जागजी, उपळा, शिंगोली, कारी नारी परिसर, आंबेजवळगे, जाहगीरदावाडी, तेर परिसरात द्राक्षाच्या बागा आहेत. तुळजापूर तालुक्यात अपशिंगा, काटी, सावरगाव, मंगरूळ, भूम तालुक्यातही द्राक्षाच्या बागा आहेत. परंडा व उमरगा तालुक्यातही द्राक्ष, पपई, कलिंगड, डाळिंब आदी फळशेती केली जाते. उत्पादित माल स्थानिक बाजारपेठेसह हैदराबाद व पुणे येथे पाठवला जातो. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असून, पाऊस पडत आहे. यामुळे काही दिवसांत तोडणीला येणाऱ्या द्राक्षबागांना फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यंदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात सतत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षबागांवर परिणाम झाला आहे. द्राक्षबागांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली आहे. यामुळे बहुतांश शेतकरी प्रथमच आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादित मालाचा चांगला दर्जा राहिला तर बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार आर्थिक संकटात आहे.
रोज फवारणी सुरू, खर्च दुपटीने वाढला, भरपाई द्यावी
हाता-तोंडाशी आलेल्या फळबागांचे ढगाळ वातावरण व पावसामुळे नुकसान होत आहे. यंदा सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाच्या फवारणीसाठी खर्च करावा लागतो. जागजी शिवारात जवळपास ५० एकर द्राक्ष बागा आहेत. द्राक्षबागांवर करपा, भुरी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे.
फळबागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी
ढगाळ व दमट वातावरण झाल्याने द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना एक एकर फळबाग तोडणीपर्यंत जोपासण्यासाठी सरासरी ७ ते १० लाख रुपये खर्च येतो. जिल्ह्यात जवळपास ६०० हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. मंगळवारी काही भागत झालेल्या पावसामुळे तोडणीला आलेले द्राक्षाचे नुकसान होत आहेत.