पुणे : भारत हा २०२१-२२ मध्ये जगातील सर्वात जास्त साखरेचे उत्पादन करणारा तिसरा देश ठरला आहे. त्याचबरोबर दुधाच्या उत्पादनातही भारताची प्रगती चांगली आहे. येणाऱ्या काळातील शाश्वतात, कार्बन क्रेडिट, ग्रीन एनर्जी हे शेतीच्या भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर सदर परिषदेमध्ये चर्चिले गेलेले सर्व विषय सरकारी धोरणे ठरवण्यासाठी दिशादर्शक ठरतील असं मत माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केलं. अद्ययावत आणि शाश्वत दुग्ध व्यवसाय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान, इंडियन डेअरी असोशिएशन, बाएफ संस्था आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ जानेवारी रोजी पुणे कृषी महाविद्यालयात आयोजित केलेल्या "अद्ययावत आणि शाश्वत दुग्ध व्यवसाय राष्ट्रीय परिषदेचा" आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे उपस्थित होते. या परिषदेमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांपुढील आणि दुग्धव्यवसायातील भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या परिषदेमध्ये दुग्धव्यवसायतील उत्पादन वाढ, नाविन्यपूर्णता, शाश्वतता, दुग्धव्यवसायासाठी सरकारी संस्थेकडून मिळणाऱ्या योजना किंवा आर्थिक सहाय्य, दुधाची गुणवत्ता या विषयांवर नामवंत शास्त्रज्ञांकडून तांत्रिक चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. दुधाचे उत्पादन ही महागाई नसून प्रगती आहे. कृषी महाविद्यालयातील सर्व विभागांनी समन्वयातून कार्य केल्यामुळे ही परिषद यशस्वी ठरली आहे असे प्रतिपादन इंडियन डेअरी असोशिएशनचे चेअरमन डॉ. जे. बी. प्रजापती यांनी केले.
यावेळी त्याचबरोबर याप्रसंगी भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यातील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, सदर परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक ठरलेल्या इंडियन डेअरी असोशिएशन, बाएफ संस्था आणि विद्यापिठातील संशोधकांचे कृषी महाविद्यालय पुणेचे सहाय्यक प्राचार्य सुनील मासाळकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी इंडियन डेअरी असोशिएशनचे चेअरमन डॉ. जे. बी. प्रजापती, डॉ. जे.व्ही. पारेख, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे जनरल मॅनेजर अनिल हतेकर, कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, डॉ. पी. टी. ढोले, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने उपस्थित होते. इंडियन डेअरी असोशिएशनच्या सदस्या रिची अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तर देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी आभार व्यक्त केले.