Maharashtra Agriculture : राज्याच्या कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रकल्पासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे योजनांचा प्रलंबित निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये बाह्य हिस्सा आणि राज्य हिश्श्याचा सामावेश असून याद्वारे विविध बाबींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने २०१९-२० सालापासून पुढील सात वर्षासाठी म्हणजेच २०२६-२७ सालापर्यंत राज्यातील सर्वच जिल्ह्यांत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट प्रकल्प) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी २०२४-२५ या वर्षात १६० कोटी रूपयांची अर्थसंकल्पी तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी विविध बाबींच्या अंमलबजावणीसाठी बाह्य हिश्श्याचा २१ कोटी व राज्य हिश्श्याचा ९ कोटी याप्रमाणे एकूण ३० कोटींचा निधी वितरित केला आहे.
दरम्यान, स्मार्ट प्रकल्प संचालकाने केलेल्या विनंतीनुसार बाह्य हिश्श्याचा ४१ कोटी ७५ लाख व राज्य हिश्श्याचा १८ कोटी ३९ लाख याप्रमाणे एकूण ६० कोटी १५ लाख रूपयांचा निधी राज्य सरकारने वितरीत केला आहे. हा निधी योजनांच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे.