मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात.. यामध्ये वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा कालावधीत शेतकऱ्यांना शेतात पाणी उपसताना, मोटर चालु करताना अनेकदा त्रास होतो.
महावितरणला वीज जाण्यापूर्वी ग्राहकांना एसएमएस पाठविणे अनेकदा शक्य होत नाही. अशा स्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. शॉर्टसर्किटमुळे वीज अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो.
शेतकऱ्यांनी सावध राहावे
वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. याशिवाय घरातील ओलसर विद्युत उपकरणे, ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे अपघाताची शक्यता असते. सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे.
फीडर बंद पडतो म्हणजे काय?
विजेच्या खांबात वीज उतरू नये म्हणून चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसवले जाते. पावसाचे थेंब त्यावर पडताच त्याला तडे जातात. त्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत जातो आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन (ब्रेकर) फीडर बंद पडतो.
तक्रार कोठे व कशी नोंदवाल?
वीजग्राहकांसाठी महा- वितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२- ३४३५ किंवा १८००-२३३- ३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाइल अॅप, www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात.
तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून ०२२- ४१०७८५०० या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यास किंवा मोबाइल क्रमांकावरून NO POWER हा संदेश ९९३०३९९३०३ या महावितरणच्या मोबाइल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.