विजयकुमार गाडेकर
शिरूर कासार : सूर्य आग ओकत असून कमालीचे तापमान वाढत आहे. निसर्ग अधिवास धोक्यात येत असल्याने सापाचा संचार नागरी वस्तीकडे वाढत असतो. साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्याने त्याला उष्णता सहन होत नाही. अशावेळी ते गारव्याचा आधार शोधत नागरी वस्तीत येतात. मात्र, प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही.
काही मोजक्या प्रजाती सोडता बिनविषारी साप आढळून येतात. मात्र, विषारी, बिनविषारी ओळख नसल्याने साप दिसताच घबराट होते. चुकून सर्पदंश झालाच तर घाबरून न जाता रुग्णालय गाठण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. बिनविषारी साप असला तरी भीती पोटी माणूस घाबरतो. अशा वेळी त्याला धीर देणे गरजेचे असते. सर्पदंश झाल्यास वेळ वाया न घालता ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जाणे महत्त्वाचे असते.
साप शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. पावसाळ्यात शेतात सापाचा वावर अधिक असतो. उन्हाळ्यात गवत, झाडी, नदीकाठ, पाणवठे कोरडे पडल्यामुळे साप थंडावा शोधत नागरी वस्तीकडे येतात. उन्हाळ्यात आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते.
साप एका जागी फार काळ थांबत नाही. साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवावे. म्हणजे सापाचा जीव वाचेल व आपला धोकादेखील संपुष्टात येईल. तरीही आपल्या घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असून, यामुळे धोका कमी होऊ शकतो.
शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा
सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण फार कमी...
सर्पदंश झाल्यानंतर मृत्यू होतोच, असे नाही. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता जवळच्या सर्पविष लस उपलब्ध असलेल्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. वेळेवर उपचार मिळाल्यास विषारी साप चावला तरी मृत्यूचा धोका टळतो. - सिद्धार्थ सोनवणे, अध्यक्ष, सर्पमित्र संनियंत्रण समिती
काय सांगतात आरोग्य अधिकारी
भारतात प्रतिवर्षी एक लाख नागरिकांना सर्पदंश होतो. यापैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे आढळत नाहीत. तर, ६५ टक्के सर्पदंश घराबाहेर होतो. घरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण ३५ टक्के आहे.
सर्पदंश : लक्षणे, तपासणी अन् उपचार
विषारी साप : रसेल व्हायपेर, कोब्रा, क्रेट, किंग कोब्रा या सापांच्या विषारी जाती असल्याचे सर्वमित्र सांगतात.
सर्पदंशानंतरची लक्षणे: सर्पदंशाच्या जागी सूज येणे, रक्तस्राव होणे, पोट दुखणे, उलट्या, डोळ्याच्या पापण्या खाली येणे, दम लागणे.
तपासणी : २० मिनिट ब्लीडिंग टाईम व क्लॉटिंग टाइम टेस्ट, लघवी तपासणी, रक्त तपासणी व ईसीजी.
उपचार : प्रथम रुग्णाला धीर देणे महत्त्वाचे असते. कारण ७० टक्के साप बिनविषारी असतात. अनेक वेळा भीतीपोटी रुग्ण शॉकमध्ये जातात. त्यांना धीर देणे गरजेचे असते.
सर्पदेशाच्या वरच्या बाजूने रुमाल बांधावा. दर १५ मिनिटांनी सोडून परत बांधणे तसेच रुग्णाला चालू न देणे, जेणेकरून विष पसरणार नाही. डॉक्टच्या सल्ल्यानुसार अॅन्टी स्नेक व्हेनमची तपासणी करून पूर्ण डोस देणे, उन्हाळ्यात झोपताना शेतात, घरातही विशेष काळजी घ्यावी. - डॉ. अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी