राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीच्या एकूण २१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३२५४ हेक्टर म्हणजेच १५ टक्केच पेरा झाला आहे. राधानगरी, गगनबावड्यात अद्याप पेराच झाला नसून चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात जेमतेम ४-५ टक्केच पेरणी झाली आहे. पावसाविना यंदा खरीप पिके गेली आता रब्बीचा पेराही धोक्यात आला असून, येत्या आठ-दहा दिवसात पाऊस झाला तरच पेरणी होऊ शकेल अन्यथा यंदा जमिनी पडून राहणार हे निश्चित आहे.
यंदा अखंड मान्सूनमध्ये जुलै महिना वगळता पाऊसच झाला नाही. परतीचा पावसावर खरिपाची काढणी होऊन रब्बीचा पेरा साधतो. पण यंदा काही वेगळेच वातावरण आहे. परतीचा पाऊस झालाच नाही, त्यामुळे खरीप वाया गेले. भात, नागली, भुईमुगाला मोठा फटका बसला. माळरान व डोंगरमाथ्यावर खरीप काढणीनंतर त्याच ओलीवर ज्वारी, हरभरा, मक्याची पेरणी केली जातेे; मात्र यंदा पाऊस नसल्याने जमिनी भेंगाळलेल्या आहेत.
दिवाळीमध्ये पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या कालावधीत पाऊस झाला तरच पेरण्या होऊ शकणार आहेत.
मागणीविना बियाणे पडून
साधारणत: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात रब्बीचा पेरा सुरू होतो. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडालेली असते. मात्र यंदा नोव्हेंबर उजाडला तरी मागणीविना ज्वारी, हरभरा, मक्याचे बियाणे पडून आहेत.
ज्वारी महागणार..
सगळीकडेच परतीच्या पावसाने फसवल्याने खरीप ज्वारीलाही फटका बसला आहे. त्यातच रब्बी ज्वारीची पेरणीच अद्याप होऊ न शकल्याने आगामी काळात ज्वारी महागणार हे निश्चित आहे.
हातकणंगलेमध्ये सर्वाधिक २० टक्के पेरणी
हातकणंगले तालुक्यात रब्बीचे सर्वाधिक ६०१५ हेक्टर क्षेत्र आहे. तिथे १२०७ हेक्टरवर (२० टक्के) पेरणी झालेली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात ९५ पैकी १५ हेक्टर आणि करवीरमध्ये १७७५ पैकी २६२ हेक्टर पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय प्रमुख पिकांची पेरणी अशी (हेक्टरमध्ये)
तालुका | ज्वारी | गहू | मका | हरभरा |
हातकणंगले | ११७८ | ८ | ४ | १७ |
शिरोळ | ४२ | ० | ० | २ |
पन्हाळा | १७५ | १० | ५० | ३० |
शाहूवाडी | १५ | ० | २७ | ३ |
राधानगरी | ० | ० | ० | ० |
गगनबावडा | ० | ० | ० | ० |
करवीर | २५२ | २ | ० | ० |
कागल | ३३० | ० | ० | २४ |
गडहिंग्लज | ९१० | ० | ० | १३० |
भुदरगड | ० | ० | ० | १० |
आजरा | ११ | ० | ० | ४ |
चंदगड | १२ | ० | ० | ० |